अहमदनगर : 559 शाळा होणार चूल मुक्त

माध्यान्ह भोजन आहार : गॅस कनेक्शन नसलेल्या शाळांचे मागवले प्रस्ताव
अहमदनगर : 559 शाळा होणार चूल मुक्त

अहमदनगर (प्रतिनिधी) -

शासनाकडून जिल्ह्यात दिल्या जाणार्‍या मध्यान्न भोजन आहारासाठी आतापर्यंत अनेक शाळांमध्ये चुलीवर स्वयंपाक केला

जायचा. परंतु अशा शाळांना आता गॅस कनेक्शन देण्याच्या हेतूने शासनाने या शाळांकडून प्रस्ताव मागवले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 559 शाळांना गॅस कनेक्शन मिळणार असून त्या चुल मुक्त होणार आहेत.

शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यासाठी शासनाने शालेय पोषण आहाराची योजना अमलात आणली. या योजनेतून जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण 4 हजार 547 शाळांमधून शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. या शाळांपैकी 3 हजार 998 शाळांकडे आहार शिजवण्यासाठी गॅस कनेक्शन आहेत. मात्र, जिल्ह्यात अजूनही 559 शाळा अशा आहेत ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही आणि येथील पोषण आहार चुलीवर शिजवला जातो. प्रामुख्याने दुर्गम भागातील अकोले तालुक्यात अशा सर्वाधिक शाळा आहेत. आहार शिजविताना अशा शाळांतील कर्मचार्‍यांना चुलीतून निघणार्‍या धुराचा सामना करावा लागत आहे. या धुरावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने आता शालेय पोषण आहार चुलीवर शिजविणार्‍या शाळांना गॅस कनेक्शन देण्याचे ठरिवले आहे. दोन महिन्यांपूर्वी शिक्षण संचालक कार्यालयाने गॅस कनेक्शन नसलेल्या शाळांची माहिती व प्रस्ताव मागवले आहेत. नगर जिल्ह्यातील 559 शाळांना गॅस कनेक्शन दिले जाणार असल्याने या शाळा धूरमुक्त होणार आहेत.

................

गॅस जोड नसणार्‍या शाळा

अकोले 117, संगमनेर 1, कोपरगाव 35, श्रीरामपूर 46, राहाता 13, राहुरी 16, नेवासा 60, शेवगाव 10, पाथर्डी 77, कर्जत 13, जामखेड 10, श्रीगोंदा 65, पारनेर 62, नगर 1, नगर महापालिका 23 एकूण 559.

...................

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com