सत्तेच्या चाव्या कोणाकडे ? आज कळणार

शिक्षक बँक निवडणूक || 98 टक्के मतदान
सत्तेच्या चाव्या कोणाकडे ? आज कळणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी सकाळी आठ वाजता मतदानाला सुरूवात झाली. दुपारी चार वाजता संपलेल्या मतदानानंतर बँकेसाठी 98 टक्के शिक्षक सभासदांनी मतदान केल्याची आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली. बँकेच्या 10 हजार 464 सभासदांपैकी 10 हजार 233 सभासदांनी मतदानाचा हक्क बाजावत आपल्या मताचे दान कोणाला दिले हे आज कळणार आहे. दरम्यान, आज सोमवार (दि.17) रोजी सकाळी नगरमध्ये मतमोजणीला सुरूवात होणार असून दुपारपर्यंत बँकेच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे राहणार हे स्पष्ट होणार आहे.

यंदाच्या जिल्हा शिक्षक बँकेच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे लांबलेली निवडणूक प्रक्रिया असून खंडपीठाच्या आदेशानंतर सहकार खात्याने निवडणूक घेतली. दरम्यान, गेली आठ दिवस सर्व मंडळांच्या जोरदार प्रचारामुळे निवडणूक चांगलीच गाजली. रविवारी सकाळी 8 वाजता बँकेसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली. या पहिल्या टप्यात सकाळी आठ ते दहा या काळात 22.49 टक्के मतदान झाले होते. मात्र, त्यात नंतर काहीचा वेग येत दुपारी 12 वाजेपर्यंत 46.56 टक्के म्हणजे 4 हजार 872 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

त्यानंतर मतदानाने वेग घेत दुपारी 2 पर्यंत मतदानाची टक्केवारी ही 76.77 टक्क्यावर पोहचली आणि शेवटच्या चार वाजेपर्यंतच्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी 97.79 झाली. जिल्ह्यात मतदानासाठी 30 केंद्र होती. यातील तीन केंद्रात 99 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालेले आहे. यात श्रीरामपूर, जामखेड आणि नेवाशातील केंद्राचा समावेश आहे. तर सर्वात कमी मतदान हे अकोले तालुक्यातील केंद्रावर 95.86 टक्के झाले आहे.

जिल्हा शिक्षक बँकेच्या निवडणुकीमुळे गेल्या आठ दिवसांपासून नगर जिल्ह्यातील गुरूजींचे राजकारण चांगलेच तापले होते. या निवडणुकीसाठी चार मंडळात सरळ लढत होत आहे. यात विद्यमान सत्ताधारी मंडळ गुरूमाऊली बापू तांबे गट, सदिच्छा आणि बहुजन आघाडी (राजू शिंदे), गुरूकुल आणि गुरुमाऊली रावसाहेब रोहकले गट यांच्यात लढत होती. बँकेच्या निवडणुकीसाठी सकाळपासून उत्साह दिसत होता.

गुरूमाऊलीचे नेते तांबे दक्षिण जिल्ह्यात फिरत होते. तर गुरूमाऊलीच्या दुसर्‍या फळीतील नेते उत्तर जिल्ह्यात फिरत होती. सदिच्छाचे नेते शिंदे हे मतदान करून उत्तर जिल्ह्यात फिरत होते. गुरूकुल मंडळाचे नेते संजय कळमकर हे नेवाशात अडकून पडले होते. सर्व मंडळाकडून विजयाचा दावा होत असून शिक्षक सभासद कोणाच्या हाती बँकेच्या चाव्या देणार हे आज दुपारी स्पष्ट होणार आहे. दरम्यान आज सकाळी मतमोजणीची प्रक्रिया होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी गणेश पुरी, सहायक निवडणूक अधिकारी देविदास घोडचोर यांनी दिली.

महिला शिक्षकांचा उत्साह मोठा

यंदाच्या शिक्षक बँकेच्या निवडणूक प्रचार आणि काल झालेल्या मतदान प्रक्रियेत महिला शिक्षकांचा उत्साह मोठा दिसत होता. खर्‍याअर्थाने महिला शिक्षकांनी बँक समजून घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे यानिमित्ताने दिसून आले. मागील वर्षीपेक्षा यंदा निवडणुकीचा टक्का वाढला असून सभासद शिक्षकांची बँकचा कारभार चांगला व्हावा, यासाठी प्रचारात प्रयत्न केल्याचे दिसून आले.

असे झाले मतदान कंसात टक्केवारी

संगमनेर 1-338 (96.57), संगमनेर 2-334 (98), संगमनेर 3- 349 (97.21), नगर 1- 371 (97.63), नगर 2-380 (96.94), पारनेर 1-417 (98.12), पारनेर 2-416 (97.65), कोपरगाव 1-278 (97.54), कोपरगाव 2- 282 (97.92), राहाता-कोपरगाव 293 (97.99), राहाता- श्रीरामपूर 236 (98.33), श्रीरामपूर 461 (99.14), जामखेड 429 (97.72), पाथर्डी 1-373 (99.47), पाथर्डी 2-369 (98.40), राहुरी 1- 386 (98.97), राहुरी 2-376 (96.16), शेवगाव 1-322 (97.58), शेवगाव 2-331 (98.22), श्रीगोंदा 1- 313 (97.81), श्रीगोंदा 2-313 (97.81), श्रीगोंदा 3- 308 (97.78), अकोले 1-329 (96.76), अकोले 2- 332 (97.65), अकोले 3- 324 (95.86), नेवासा 1- 293 (97.67), नेवासा 2- 293 (97.67), नेवासा 3- 299 (97.08), कर्जत 1 338 (99.41), कर्जत 2- 341 (98.47), एकूण 10 हजार 233 (97.79).

विकास मंडळाच्या मतदानाचा बोजवारा

विकास मंडळाची निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे अधिकार विकास मंडळाच्या पदाधिकार्‍यांना आणि सत्ताधार्‍यांना होते. सत्ताधारी मंडळांने विकास मंडळाच्या निवडणुकीतील नियोजनात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवून प्रत्येक तालुक्यात एकच मतदान केंद्र ठेवले. विरोधकांनी वारंवार मागणी करूनही शिक्षक बँके एवढे मतदान केंद्रे विकास मंडळाने ठेवणे आवश्यक होते. मात्र, प्रत्येक प्रत्येक तालुक्यात एकच मतदान केंद्र ठेवले होते. मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येकाला रांगेत जवळपास दोन तास ताटकळत उभे राहावे लागले. विकास मंडळाच्या निवडणुकीतील विरोधकांनी या गैरसोईचा तिव्र शब्दात निषेध नोंदवला. तसेच ज्यांना निवडणुकीचे नियोजन जमले नाहीते ते विकास मंडळ कसे चालवणार? विकास मंडळाचा विकास करणार? असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com