नगरी रस्त्यांना गडकरी टच!

शनिवारी गडकरी-पवार यांच्या उपस्थितीत ४ हजार कोटींच्या महामार्ग कामांचा प्रारंभ
नगरी रस्त्यांना गडकरी टच!

अहमदनगर | प्रतिनिधी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील महामार्गाच्या अनेक कामांना मंजूरी दिल्यानंतर आता प्रत्यक्ष कामांनाही सुरूवात होत आहे. ना. गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत तब्बल ४ हजार कोटी खर्चाच्या कामांचा शुभारंभ शनिवारी होत आहे.

भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. शनिवार, २ ऑक्टोबर रोजी ४ हजार ७४ कोटी ७० लाख रुपये खर्चाच्या विविध रस्त्यांचा शुभारंभ होत आहे. अनेक वर्षानंतर ना.गडकरी हे अहमदनगर येथे येत आहेत.

त्यांच्या मार्फत जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांचा आराखडा त्यांना सादर करुन रस्त्याचा प्रश्न सोडवला जाणार असल्याचे महेंद्र गंधे यांनी यावेळी सांगितले. विळदघाट येथे त्यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार असून केडगांव जवळील सोनेवाडी रोड बायपास चौक येथे रस्ते कामाचा ते शुभारंभ करतील. यावेळी ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खा. सुजय विखे, खा. सदाशिव लोखंडे, जिल्ह्यातील सर्व आमदार, भाजपाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे गंधे यांनी सांगितले.

ना. गडकरी शनिवारी सकाळी दिवंगत खा. दिलीप गांधी यांच्या कुटुंबीयाची भेट घेणार आहेत. पत्रकार परिषदेत भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, सचिन पारखी, नरेंद्र कुलकर्णी, संतोष गांधी, अॅड. विवेक नाईक, तुषार पोटे आदी उपस्थित होते.

किती कुठे...

अहमदनगर करमाळा - टेंभूर्ण चारपदरी रस्ता ८०.३९० किलोमीटरचा असून त्याचा खर्च २ हजार १२ कोटी आहे. सावळी विहिर ते अहमदनगर बायपास रुंदीकरण ८० किलोमीटर असून त्याचा खर्च ४९६ कोटी १६ लाख आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर - भिंगार रस्ता रुंदीकरण १८.५० किलोमीटर असून त्यासाठी ३५ कोटी ४२ लाख खर्च तर राष्ट्रीय राखीव निधीमधील कामे ८४ कोटी ८० लाखांची होणार आहेत. या अहमदनगर- दौंड वासुंदे फाटा रस्ता, अहमदनगर कडे आष्टी-जामखेड रोड रस्ता, नगर-शिंगोटे ते कोल्हार रस्ता व कोपरगांव वैजापूर रस्ता मजबूतीकरण कामाचाही यावेळी शुभारंभ होईल.

Related Stories

No stories found.