नगरसह 18 जिल्ह्यांत राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी

बूथ कमिटीच्या बांधणीची नेत्यांवर जबाबदारी || राष्ट्रवादीचा वर्धापनदिन नगरमध्ये साजरा होणार || नगरची जबाबदारी धनंजय मुंडेंवर
नगरसह 18 जिल्ह्यांत राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जेमतेम 10 महिन्यांवर येऊन ठेपल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष बळकटीवर आणखी भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विभागीय स्तरावर बुथ कमिट्या अधिक भक्कम आणि सक्षम करण्याची जबाबदारी विविध नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्यावतीने निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांचे शिबीर आयोजित करण्यात येणार असून त्या शिबिराला शरद पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. येत्या 10 जून रोजी पक्षाच्या स्थापनादिनी अहमदनगर शहरात भव्य सभा आयोजित करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सद्य राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत पवार यांनी कर्नाटक निवडणुकीची माहिती दिली. कर्नाटकमध्ये काँग्रेसने राबवलेली प्रचार मोहीम, काँग्रेसची निवडणूक रणनीती, मतदारांचा मिळालेला प्रतिसाद, कर्नाटकमध्ये भाजप नेमका कुठे कमी पडला याबाबत शरद पवार यांनी आपली निरीक्षणे मांडली. कर्नाटकच्या जनतेने भाजपाला नाकारले आहे. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती असून महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र राहिले पाहिजे, अशी सूचना पवार यांनी बैठकीत केल्याचे समजते.

आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आल्या पाहिजेत. कारण राज्यातील ताकदीवर आपली देशपातळीवर ओळख निर्माण होणार आहे. त्यासाठी पक्ष वाढीवर भर देऊन नवीन चेहर्‍यांना संधी द्यावी. तसेच तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेले जिल्हा आणि तालुका अध्यक्ष बदलण्याबाबत विचार करा, अशा सूचना पवार यांनी बैठकीत केल्याचे समजते.

दरम्यान, या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रत्येक गावात मएक तास राष्ट्रवादीसाठीफ हा कार्यक्रम घेण्यात येतो. आजच्या बैठकीत मएक तास राष्ट्रवादीसाठीफ या कार्यक्रमावर अधिक भर द्यायचा असा निर्णय घेण्यात आला. येत्या 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 349 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने संपूर्ण राज्यात साजरा करण्यात येणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

10 जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसला 24 वर्षे पूर्ण होऊन राष्ट्रवादी पक्ष 25 व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने अहमदनगर येथे जाहीर सभेचे आयोजन करुन हा वर्धापन दिन साजरा केला जाणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

दरम्यान, राज्यात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याबाबत बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. त्र्यंबकेश्वरमध्ये सूरू असलेल्या प्रथेचा गैरसमज करण्यात आला आहे. वर्षानुवर्ष तिथे परंपरा चालू आहे. मात्र, यासाठी तत्काळ एसआयटी स्थापन करण्यात आली याबाबत आश्चर्य जयंत पाटील यांनी व्यक्त केले. महविकास आघाडीत लोकसभा आणि विधानसभेच्या जागावाटपाचे कोणतेही सूत्र ठरलेले नाही. कोणत्याही लोकसभा मतदारसंघाबाबत आमची चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मला फसविण्यासाठी परमबीर यांचा वापर : अनिल देशमुख

दरम्यान, मला फसविण्यासाठी पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांचा वापर करण्यात आला. आता त्याचे बक्षीस म्हणून आम्ही त्यांच्यावर जी निलंबनाची कारवाई केली होती ती कारवाई मागे घेण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीपूर्वी केला. याबाबत आजच्या पक्षाच्या कोअर समितीच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचे देशमुख यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

नगरची जबाबदारी धनंजय मुंडेंवर

प्रत्येक राज्यातील 18 जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर या 17 जिल्ह्यांची जबाबदारी राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन ते तीन नेत्यांवर देण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस या 18 जिल्ह्यांमध्ये मोर्चे बांधणी करणार आहे. नाशिक, नगर जिल्ह्याची जबाबदारी माजीमंत्री धनंजय मुंडे (बुथ प्रमुख) यांच्यावर टाकण्यात आली आहे. , विक्रम काळे, सतीश चव्हाण सह बुथ प्रमुख राहतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com