नगर : नगर जिल्ह्यात मुलीच हुश्शार !
सार्वमत

नगर : नगर जिल्ह्यात मुलीच हुश्शार !

बारावीचा निकाल : 92 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Nilesh Jadhav

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात जिल्ह्याचा निकाल 91.97 टक्के लागला असून या निकालात 96.12 टक्के मुली तर 88.93 टक्के मुले बारावीची परीक्षा पास झाले आहेत.

दरम्यान, नगर जिल्हा मागील वर्षी पुणे विभागात दुसरा होता. यंदा मात्र तो तिसर्‍या स्थानावर फेकला गेला आहे. विभागात सोलापूर जिल्हा 93.74 टक्क्यांसह अव्वल असून पुणे जिल्हा 92.94 टक्के मिळवत दुसर्‍या स्थानावर आहे. नगर जिल्ह्यात कर्जतचा सर्वाधिक 95.75 टक्के, तर श्रीरामपूर तालुक्याचा सर्वात कमी 85.32 टक्के निकाल लागला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात 4 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचा निकाल 88 टक्के लागला होता. यंदा त्यात वाढ झाली आहे. शाखानिहाय निकालात शास्त्र शाखेचा 98.1, वाणिज्य शाखेचा 94.55 आणि कला शाखेचा निकाल 80.61 टक्के लागला आहे. जिल्ह्यातून 12 वीच्या परिक्षेसाठी 63 हजार 513 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 58 हजार 412 विद्यार्थी पास झाले आहेत.

जिल्ह्यातील पहिल्या चार तालुक्यांत कर्जत पहिल्या स्थानावर आहे. कर्जत तालुक्यातील 3 हजार 111 विद्यार्थी पास झाले असून निकाल 95.97 टक्के झाला आहे. यासह दुसर्‍या क्रमांकावर संगमनेर असून 6 हजार 203 विद्यार्थी पास झाले आहेत तर निकाल 94.60 टक्के तर शेवगाव तालुका तिसर्‍या स्थानावर आहे. 3 हजार 974 विद्यार्थी उर्त्तीण झाले असून निकाल 94.57 टक्के झाला आहे. चौथ्या क्रमांकावर जामखेड असून 3 हजार 33 विद्यार्थी पास झाले आहेत. टक्केवारी 94.42 टक्के आहे.

125 शास्त्र शाखेचा 100 टक्के निकाल

पूर्वी ज्युनिअर कॉलेज अथवा उच्च माध्यमिक विभागाच्या शाळेतील कला, शास्त्र आणि वाणिज्य विभागाचा निकाल हा एकत्रित जाहीर करण्यात येत होता. यंदा मात्र, शिक्षण मंडळाने शास्त्र, कला आणि वाणिज्य विभागाचा एकाच ज्युनिअर कॉलेजचा शंभर टक्क्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर केलेला आहे. यामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ज्युनिअर कॉलेजमधील 125 शास्त्र विभागाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यासह 26 वाणिज्य शाखांचा निकालही शंभर टक्के, 16 कला शाखांचा निकाल शंभर टक्के आहे. यासह व्यवसायिक शिक्षण विभागातील तिघांचा निकाल शंभर टक्के आहे.

बारावीचा निकालावर दक्षिणेचा वरचष्मा

संगमनेर|संदीप वाकचौरे|Sangmner

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्याचा निकाल 91. 97 टक्के लागला असला, तरी उच्च श्रेणीत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याचे निकालाच्या विश्लेषण वरून दिसत आहेत. तर बारावीच्या निकालात उत्तर जिल्ह्यापेक्षा दक्षिणेचे निकाल अधिक चांगला असल्याचे समोर आले आहे.

बारावीचा ऑनलाईन निकाल गुरुवारी दुपारी 1 वाजता जाहीर झाला. त्यात अमदनगर जिल्ह्यातील 36 हजार 682 विद्यार्थी व 26 हजार 837 विद्यार्थिनी यांनी बारावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 32 हजार 621 असून शेकडा प्रमाण 88 दशांश 93 टक्के आहे.

तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 25 हजार 791 असून शेकडा प्रमाण 96 दशांश बारा इतके आहे. मुलांपेक्षा मुलींचे पुण्याचे जिल्ह्यातील प्रमाण सुमारे सहा टक्के अधिक आहेत. गेले काही वर्षातील मुलींच्या निकालाचे प्रमाण सातत्याने अधिक असल्याचे दिसून येत असून या वर्षीच्या निकालावर मुलींची छाप राहिली आहे.

पुनर्परीक्षेत देखील मुलींचं निकालाचा वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात 2536 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील 641 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे हे प्रमाण 25. 28 टक्के आहे. तर 425 विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा दिले असून त्यातील 169 विद्यार्थ्यांनी पास झाले आहेत हे शेकडा प्रमाण 39.76 टक्के आहेत. सुमारे मुलींचा उंचावलेला आहे. विज्ञान शाखेत 33 हजार 674 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली असून 4294 विद्यार्थी परीक्षेत उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत हे प्रमाण अवघे 12.75 आहे. तर प्रथम श्रेणी 16 हजार अठरा विद्यार्थ्यांनी प्राप्त केले असून हे प्रमाण 47. 56 टक्के आहे.

द्वितीय श्रेणी 12281 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हे प्रमाण देखील 36.47 टक्के आहे. कला शाखेत 19417 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 579 विद्यार्थी उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत हे प्रमाण अवघे 2.98 टक्के आहे. प्रथम श्रेणीत 6765 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण 34. 84 टक्के आहे. तर द्वितीय श्रेणी सात हजार आठशे सदतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हे शेकडा प्रमाण 40.36 टक्के आहे.

वाणिज्य शाखेसाठी नऊ हजार 368 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी एक हजार ऐंशी विद्यार्थी उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण 11.52 टक्के आहे. प्रथम श्रेणीत 3921 विद्यार्थी उत्तीर्ण असून हे प्रमाण 41.85 टक्के आहे.तर तीन हजार 643 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास असून हे प्रमाण 30.88 टक्के आहे. व्होकेशनल अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यातून 1054 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ते 30 विद्यार्थी उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण अवघे 3.3 टक्के आहे. 500 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असून हे प्रमाण 47.43 टकके आहे.तर द्वितीय श्रेणी 363 विद्यार्थी उत्तीर्ण असून हे प्रमाण 34.44 टक्के इतके आहे.

विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक

जिल्ह्यात बारावीला बसलेल्या 63 हजार 513 विद्यार्थ्यांपैकी 33674 विद्यार्थी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहेत. यांच्या 98 .01 टक्के लागला आहे. कला शाखेचा निकाल 80.61 टक्के. वाणिज्य विभागाचा 94.55%, व्होकेशनल विभागाचा 85.20 टक्के निकाल लागला आहे. या निकालात सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा असून सर्वात कमी निकाल कला शाखेचा आहे.

कर्जतचा सर्वाधिक निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक निकाल कर्जत तालुक्याचा असून तो 95.3 75 टक्के आहे. कर्जत तालुका प्रथम क्रमांकावर ती असून त्याखालोखाल संगमनेर तालुका 94.60, तर तृतीय स्थानी शेवगाव तालुका असून तालुक्‍याचा निकाल 94.57 लागला आहे.

जिल्ह्यात सर्वात कमी निकाल श्रीरामपूर तालुक्याचा आहे. श्रीरामपूरचा शेकडा निकाल 85 दशांश 32 टक्केआहे. त्यानंतर राहुरी तालुका 89.22 ,अकोले तालुका 89.36, नेवासा तालुका एकूण 89.98 असे निकाल आहेत. जिल्ह्यातील तालुक्यांची निकालाची आकडेवारी लक्षात घेता दक्षिण विभागातील तालुक्यांचे निकाल उत्तरेतील निकाला पेक्षा सरासरी चांगले असल्याचे दिसून येत आहे.

गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रयत्नांची गरज

जिल्ह्याच्या निकालाची परंपरा शेकडा प्रमाणात चांगली दिसत आहे. तथापि सर्व शाखांच्या निकालाकडे लक्ष दिले असता उच्च श्रेणीतील विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याचे दिसून येत आहे. हे प्रमाण दहा टक्के देखील असू शकले नाहीत. तर पास होण्याचे प्रमाण बारा टक्के आहेत. सर्वाधिक निम्न व उच्च स्तराचे प्रमाण यादेखील आंतर असल्याचे समोर येत आहेत.

विज्ञान शाखेतील विद्यार्थी सध्या स्थानिक पातळीवरील शिकवणी तसेच विविध नामांकित क्लासेस साठी नाव नोंदणी करून शिकत आहे. अशा परिस्थितीत महाविद्यालयात कमी व क्लासेस कडे अधिक लक्ष असे असताना देखील व काही ठिकाणी विद्यार्थी दोन्ही ठिकाणी उपस्थित राहू शकत असले तरी उच्च श्रेणीतील आकडा फारसा गाठू शकले नसल्याचे बाब यानिमित्ताने समोर आली आहेत. त्यामुळे विद्यार्थी पास असले तरी जिल्ह्यातील संस्थाचालकांनी गुणवत्तेसाठी आग्रही भूमिका घेण्याची गरज आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com