
अहमदनगर (प्रतिनिधी)
महानगरपालिका कर्मचार्यांची दिवाळी गोड होणार आहे. त्यांना दिवाळीपूर्वी 10 हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिली.
महानगरपालिकेच्या कर्मचार्यांना दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान, थकीत देणे दिवाळी पूर्वी मिळण्याची मागणी कामगार युनियनने केली होती. या संदर्भामध्ये महापौर शेंडगे यांनी काल (शुक्रवारी) दुपारी बैठक आयोजित केली होती. यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, नगरसेवक शाम नळकांडे, विजय पठारे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर शेंडगे म्हणाल्या, कामगार युनियनने दिवाळी सणा निमित्त कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान व थकीत देणे देण्याबाबत मागणी केली होती. याबाबत कामगार युनियन पदाधिकारी, प्रशासन व पदाधिकारी यांची बैठक घेवून बैठकीमध्ये कर्मचार्यांच्या दृष्टिने सर्वानुमते चांगला निर्णय घेण्यात आला.
कर्मचार्यांची दिवाळी गोड व्हावी यादृष्टिने मनपा कर्मचार्यांना सानुग्रह अनुदान म्हणून 10 हजार रूपये देणे बाबत निर्णय घेण्यात आला. तसेच कर्मचार्यांना दरवर्षी प्रमाणे दिवाळी अॅडव्हान्स देखील मिळणार आहे. कर्मचार्यांना सदरची रक्कम दिवाळी सणाच्या आधी देण्याच्या दृष्टिने कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यामुळे कर्मचार्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.
यावेळी उपमहापौर भोसले म्हणाले, पदाधिकारी, प्रशासन व कामगार युनियन सगळ्यांनी आपले विचार मांडले परंतु यातून तोडगा काढणे आवश्यक आहे. महापौर व आम्ही पदाधिकारी मिळून एक चांगला निर्णय कर्मचार्यांसाठी घेतला आहे. त्यामुळे कर्मचार्यांना दिवाळी पूर्वी पगार, अॅडव्हान्स व सानुग्रह अनुदान मिळणार आहे.