ऊस तोडणी कामगारांची 100 टक्के नोंदणी होणार

जिल्हा परिषद : अमृत पंधरवडा अभियान
ऊस तोडणी कामगारांची 100 टक्के नोंदणी होणार

अहमदनगर (प्रतिनिधी)

सध्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यासाठी देश पातळी ते जिल्हा पातळीपर्यंत शासकीय पातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे नगर जिल्हा परिषदेने देखील अमृत पंधरवाडा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून याचा भाग म्हणून झेडपी समाज कल्याण विभाग जिल्ह्यातील ऊस तोडणी कामरांची 100 नोंदणी करणार आहे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून अमृत पंधरवाडा अभियान राबविण्यात येणार आहे. यात जिल्हा परिषदेचा प्रत्येक विभाग सहभागी होवून आगळे-वेगळे उपक्रम राबविणार आहे. जिल्हा परिषदेचे 15 विभाग असून यातील समाजकल्याण विभाग हा जिल्ह्यातील शंभर टक्के ऊसतोडणी कामगारांची नोंदणी करणार आहे. रोजगार हमी विभाग जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अंगणवाड्या भोवती जैविक संरक्षक भिंती उभारणी करणार आहे. यात प्रत्येक तालुक्यातून 40 शाळा आणि अंगणवाड्यांची निवड करण्यात येणार आहे.

प्राथमिक शिक्षण विभाग 150 शाळांना लोकसहभागातून शुध्द पाणी पुरवठा व अन्य भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे. तसेच जिल्ह्यातील एकल विद्यार्थ्यांची नाेंंदणी करणार असून नवोदय विद्यालयाच्या अभ्यासक्रमांच्या धर्तीवर तिसरी आणि चौथी इयत्तेसाठी पुस्तक तयार करणार आहेत. माध्यमिक शिक्षण विभाग 151 शाळा आदर्श करणार असून माध्यमिक शाळांमधील एकल विद्यार्थ्यांची नोंदणी करणार आहे.

अर्थ विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील 25 टक्के लोकल फंड, एजी, पीआरसी मुद्दे सादर करणार आहे. आरोग्य विभाग प्रधानमंत्री मातृत्ववंदन योजनेचा तिसरा टप्पा पूर्ण करणार असून 60 वर्षावरील नागरिकांचे शंभर टक्के बुस्टर डोस लसीकरणाचे उद्दिष्टे ठेवण्यात आलेले आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हर घर जल योजनेत प्रत्येक तालुक्यातून किमान पाच गावात या योजनेचा लाभ देणार आहे. कृषी विभाग महाडिबीटी मार्फत वैयक्तिक लाभार्थ्यांचे कागदपत्रे 100 टक्के जमा करणार आहेत. शेतकर्‍यांना बांधावर खतांचे वाटप करणार आहे.

पशूसंवर्धन विभाग 50 पूश आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणार आहे. स्वच्छता विभाग 101 गावे आणि 1 तालुका ओडिएफ प्लस करणार आहे. तसेच स्वच्छता विषयक जनजागृतीसाठी रथ यात्रेचे आयोजन करणार आहे. ग्रामपंचायत विभाग कामगारांना जेवणाची व्यवस्था, एकल महिलांची नोंदणी करणे, ग्रामपंचायत पातळीवर स्थानिक निधी लेखा आक्षेप 25 टक्के निकाली काढणार आहे.

किमान 25 टक्के संशयीत अपहार प्रकरणे जिल्हा परिषदेकडे सादर करणार आहे. लघू पाटबंधारे विभाग जल शक्ती अभियानात किमान 45 बंधारे बांधून पूर्ण करणार आहे. बांधकाम उत्तर आणि दक्षिण विभाग किमान 100 शाळा, अंगणवाडी इमारतींना रेन वॉटर हॉर्वेस्टींग करणार आहे. तसेच नव्याने झालेल्या सर्व शासकीय इमारतींची तपासणी करून गळती लागलेल्या इमारतींचे दोष निवारण कालावधीत दुरूस्ती करणार आहे. प्रत्येक विभागाने घेतलेल्या जबाबदारीनूसार शंभर टक्के कामे करावीत अन्यथा संबंधीतांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी दिला आहे.

महिला बालकल्याण विभाग एकात्मिक बाल विकास प्रकल्पातंर्गत अंगणवाडी केंद्राचे अ, ब, क श्रेणी निश्चित करणार आहे. शुन्य ते सहा वर्षे वयातील सॉम आणि मॅम श्रेणीतील बालकांची आरोग्य तपासणी करणार आहे. प्रत्येक अंगणवाडी परिसारात किमान एक शेवग्याचे रोप लावणार आहे. प्रत्येक तालुक्यात किमान एक बालअंगणवाडी स्थापन करणार आहे. तर सामान्य प्रशासन विभाग जिल्हा व तालुका पातळीवरील सर्व कार्यालयाचे अभिलेख वर्गीकरण व व्यवस्थापन करणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com