कोणत्याही परिस्थितीत ‘अगस्ति’ अडचणीत येऊ देणार नाही - गायकर

कोणत्याही परिस्थितीत ‘अगस्ति’ अडचणीत येऊ देणार नाही - गायकर

अकोले |प्रतिनिधी| Akole

अगस्ति कारखान्याची निवडणूक व्हायची तेव्हा होईल मात्र शेतकर्‍यांच्या उसाचे गाळप पूर्ण करण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हा बँकेचे चेअरमन व व्हा. चेअरमन यांच्याशी चर्चा सुरू आहे. प्रिसिजनल कर्ज घेऊन कारखाना सुरू ठेऊ व कारखाना अडचणीत येऊ देणार नाही, अशी ग्वाही अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष व शेतकरी समृद्धी मंडळाचे नेते सीताराम पाटील गायकर यांनी दिली.

अगस्ती सहकारी साखर कारखान्याची काल रविवारी होणारी निवडणूक राज्य सरकारच्या आदेशाने स्थगित होऊन पुढे गेल्याने कारखान्याच्या गळीत हंगामासाठी शेतकरी समृद्धी मंडळाची रणनीती जाहीर करण्यासाठी अकोले येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी गायकर बोलत होते. यावेळी आ. डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, युवा नेते अमित भांगरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, जि. प. चे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, माकप चे नेते डॉ. अजित नवले, राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, माजी पं. स. उपसभापती मारुती मेंगाळ यांचेसह समृद्धी मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी गायकर म्हणाले, आपल्या कारखान्याचे आज मतदान होऊन उद्या मतमोजणी नंतर सभासद विश्वास टाकतील ते मंडळ कारखान्याचे गाळप हंगामाचे नियोजन करू शकत होते प्रत्यक्षात तसे त्यालाही थोडा उशीर झाला होता, मात्र निवडणूक झाली असती तर नियोजन होऊ शकले असते. मात्र सरकारने अचानक फक्त मतदान बाकी असतानाही संशयास्पद निवडणुकीला स्थगिती देऊन निवडणूक तीन महिने पुढे ढकलली आहे. आपल्या समृद्धी मंडळाने याविरूद्ध उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

आता निवडणूक व्हायच्या तेव्हा होतील मात्र कारखाना सुरू ठेवण्यासाठी योग्य नियोजन करावे लागणार आहे. अन्यथा कारखाना बंद पडेल म्हणून समृद्धी मंडळाने व संचालकांनी निर्णय घेऊन अगस्ती चालू ठेवण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते ना. अजित पवार, आ. बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून जिल्हा बँकेचे चेअरमन, व्हा.चेअरमन यांच्याशी बोललो आहे. आज सोमवारी त्यांना नगरला भेटायला जाऊन प्रिसिजनेबल कर्ज उपलब्ध करून घेणार आहे.ऊस तोड मजूर, कामगार, आदींना अ‍ॅडव्हान्स देऊन टोळ्या बुक करायच्या आहे, मशीनरीचे ईलींग, साफ सफाई करावी लागणार आहे.

त्यामुळे कारखाना टिकवण्याचा, सुरू ठेवण्याचा शब्द निवडणुकीत शेतकरी समृद्धी मंडळाने सभासदांना दिला आहे, त्यानुसार कारखाना सुरू करण्याची तयारी आम्ही करत आहोत. कारखान्यावर प्रशासक नेमण्याची तयारी सुरू असल्याचे कळते मात्र मागील दोन वर्षांचा अनुभव घेता ते योग्य होणार नाही. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत कर्ज उपलब्ध करून कारखाना सुरू ठेवून शेतकर्‍यांना अडचणीत येऊ देणार नाही, असा विश्वास दिला.

यावेळी आ. डॉ. किरण लहामटे म्हणाले, ना. अजित पवार यांनी सभेत सहकार हा ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा आहे. अगस्ती कारखाना जगला पाहिजे यासाठी आवाहन केल्याने शेतकरी सभासद आपल्या समृद्धी मंडळाच्या मागे उभे होते. सांगता सभा होऊन मतदान बाकी असताना निवडणूक थांबवून हे सरकार लोकशाहीचा गळा घोटीत आहे. हा निर्णय येताच मधुकर पिचड यांनी चेअरमन म्हणून कोर्टात जाणे अपेक्षित होते मात्र तसे न होता निर्णय कळताच समृद्धी मंडळ कोर्टात गेले. गायकर यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याविरूद्ध दाद मागितली आहे. कोर्टाने 25 तारीख दिली आहे.

मात्र या कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक करू नये यासाठी आपण विरोधी पक्षनेते अजित पवार व मुख्यमंत्री ना. शिंदे यांना भेटून विनंती करणार आहे. प्रशासक नेमला तर कारखाना बंद पडेल. या निवडणुकीत समृद्धी मंडळाला वातावरण चांगले आहे तसेच जनता जो निकाल देईल तो मान्य असेल मात्र आज कारखाना सुरू करण्यासाठी कुणाचीही वाट पाहू नका. ही भाग्यलक्ष्मी टिकली पाहिजे हा प्रमुख उद्देश ठेवून काम करा. जनतेला, सभासदांना सर्व माहीत आहे त्यामुळे आपण सर्वजण मिळून मदत करून काम करुया. सोशल मीडियावर चर्चेला महत्त्व देऊ नका, भाजपचे कार्यकर्ते कसेही वागू द्या, आपली ती संस्कृती नाही, आपण एकत्रित काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी अशोकराव भांगरे म्हणाले, मतदान बाकी असताना अतिवृष्टीचे कारण देऊन निवडणूक स्थगित केली याबाबत शंका आहे. मग शासनाला यापूर्वी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलेला असताना निवडणूक जाहिरच का केली? केवळ भाजपला राज्यात सहकाराच्या जागी पराभव दिसत असल्याने तर हे केले नाही ना? सभासदांना सर्व कळते ती दूध खुळी नाही. तेव्हा केव्हाही निवडणूक होवो सभासद जागा दाखवतील. आम्ही आता प्रिसिजनल कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून आम्ही कारखाना निश्चित चांगला चालवणार याचा विश्वास शेतकर्‍यांना देत असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. अजित नवले यांनीही आपली भूमिका विषद केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com