कृषी मंत्री सत्तार यांच्या पुतळ्यास जोडे मारून आंदोलन

खा. सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादीकडून निषेध
कृषी मंत्री सत्तार यांच्या पुतळ्यास जोडे मारून आंदोलन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरले आहेत. याच्या निषेधार्थ दिल्ली गेट येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने व आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मंत्री सत्तार यांच्या पुतळ्याला जोडे मारून दहन करण्यात आले.

सुसंस्कृत महाराष्ट्राला खोके सरकारने बदनाम करण्याचे षडयंत्रच रचले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांच्या सुसंस्कृत राज्यात महिलांचा आदर सन्मान केला जातो. मात्र आत्ताच्या खोके सरकारच्या काळात मंत्र्यांनी महिलांचा अपमान करण्याचा धडाकाच लावला असल्याची टीका महिला काँग्रेसच्या शहर जिल्हा अध्यक्ष रेश्मा आठरे यांनी केली. मंत्री सत्तार यांनी खा. सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ दिल्ली गेट येथे मंत्री सत्तार यांच्या पुतळ्यास जोडे मारून दहन करण्यात आले. यावेळी माजी आ.दादाभाऊ कळमकर, जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, साहेबान जागीरदार, अशोक बाबर, वैभव ढाकणे, संजय सपकाळ, अभिजीत सपकाळ, लता गायकवाड आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

माजी आ. कळमकर म्हणाले, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे पतन करण्याचे काम या सरकारने सुरू केले आहे. वाचाळ मंत्र्यांना सरकारमधून बाहेर करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालावे, अन्यथा हे खोके मंत्री राज्याची अब्रू चव्हाट्यावर आणतील. महिलांबद्दल अपशब्द वापरण्याचे सत्र या मंत्र्यांचे सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्रात उभे करणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी प्राध्यापक माणिकराव विधाते यांचे भाषण झाले.

शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी खा.सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गलिच्छ भाषेत टीका केली. याचा नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मी जाहीर निषेध करतो. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी तातडीने मंत्री सत्तार यांचा राजीनामा घ्यावा,अशी मागणी करतो.

- राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com