आता काळाबाजार, भेसळयुक्त बियाणे रोखण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

करोना संकटातही 15 पथके तयार : खरीप हंगामासाठी तयारी
आता काळाबाजार, भेसळयुक्त बियाणे रोखण्यासाठी कृषी विभाग सज्ज!
Tv9 Mumbai

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात 15 जूनपासून खरीप हंगाम सुरू होणार आहे. त्यासाठी आता साधारणपणे दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने सुरू केली आहे. लवकरच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली हंगाम नियोजनाची बैठक होणार आहे.

त्यासाठी कृषी विभागाची लगबग सुरू आहे. दरम्यान, हंगामात शेतकर्‍यांना वेळेवर बियाणे, किटक नाशके, खतांचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने 15 पथकांची नियुक्ती केली असून पुढील महिन्यात ही पथके जिल्हाभर अचानक भेटी सुरू करणार आहेत.

जिल्ह्यात साधारण जूनच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात मान्सून दाखल होतो. मात्र, जिल्ह्यातील खरीप हंगामाची भिस्त ही मान्सून पूर्व पावसावर अवलंबून असते. मान्सून पूर्व दमदार पाऊस झाल्यास कडधान्यासह बाजरी पिकाचे क्षेत्र वाढते आणि या पावसाने हुलकावणी दिल्यास मान्सून दाखल झाल्यानंतर होणार्‍या भिज पावासावर सोयाबीन आणि अन्य पिकांचे क्षेत्र वाढते. यामुळे पुढील महिन्यांपासूनच जिल्ह्यातील कृषी विभाग सक्रीय होणार आहे. यात जिल्हा परिषद कृषी विभागाकडे आता बियाणे, खते आणि किटकनाशकांची तपासणी, वेळेवर पुरवठा आणि गुणनियंत्रणाची जबाबदारी आहे. तर खरीप हंगामाच्या पेरणीची जबाबदारी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे सोपविण्यात आली आहे.

हंगामात कृषी केंंद्र आणि दुकानांची तपासणी करण्यासाठी तालुकानिहाय 14 आणि जिल्हास्तरावर 1 अशा 15 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या करोना संसर्गाचा कालावधी असला तरी कृषी विभाग खरीप हंगामाच्या तयारीत गुंतलेला दिसत आहे. खरीप हंगामाचे पेरणी क्षेत्राचे नियोजन करणे, बियाणे किटक नाशके, खतांची मागणी नोंदवून त्यांचा आवश्यक पुरवठा करून घेत हंगामात टंचाई होणार नाही, याची तयारी करण्यात येत आहे. पुढील आठवड्यात पालकमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम नियोजन बैठक होणार असून त्या बैठकीत खपरी हंगामाच्या तयारीवर पालकमंत्री आढावा घेवून संबंधतींना सुचना देणार आहेत.

दरम्यान, गुणनियंत्रणासाठी जिल्हास्तरावर असणार्‍या समितीचे अध्यक्ष जिल्हा कृषी विकास अधिकारी राहणार असून या समितीत मोहिम अधिकारी जिल्हा परिषद, उपविभागीय कृषी अधिकारी, वजन मापे विभागाचे निरिक्षक, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी हे सदस्य राहणार आहेत. 14 तालुक्याच्या ठिकाणी असणार्‍या समितीच्या अध्यक्षपदी त्यात्या विभागाचे उपविभागीय अधिकारी राहणार असून समितीत तालुका कृषी अधिकारी, तालुका स्तरावरील कृषी विभागाचे ऑसिफ अधीक्षक, मंडल कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे कृषीचे सदस्य राहणार आहेत.

नमुने काढण्याचे उद्दिष्ट निश्चित

जिल्हा आणि तालुकास्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या या भरारी पथकांच्या कामाचेही नियोजन करण्यात आले आहे. यात खतांचे 336 आणि 225 किटकनाशकांचे नमुने काढून ते प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी यांनी दिली.

मालधक्का बंद, खतांचा पुरवठा थांबला

माथडी कामगारांनी वाढत्या करोना संसर्गामुळे काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नगरच्या रेल्वेस्थानकातील मालधक्का बंद असल्याने पुढील काही दिवस खतांचा पुरवठा बंद राहणार आहे. मात्र, सरकार पातळीवरून यात निर्णय होवून पुन्हा मालधक्का झाल्यास खतांचा पुरवठा होण्याची आशा कृषी विभागाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com