शेती महामंडळाच्या खोल्यांच्या आजच्या जाहीर लिलावास तीव्र आक्षेप

आधी आमची राहण्याची सोय करा मगच लिलाव करा || रहिवाश्यांची मागणी
शेती महामंडळाच्या खोल्यांच्या आजच्या जाहीर लिलावास तीव्र आक्षेप

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शेती महामंडळाच्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथील ऐनतपूर मधील सुभाषवाडी-आझादवाडी येथील खोल्यांच्या आज होणार्‍या जाहीर लिलावास येथील रहिवाश्यांनी आधी आमची राहण्याची सोय करा व मगत लिलवा करा, अशी भूमिका घेत तीव्र आक्षेप घेतला आहे.

याठिकाणी जे ग्रामस्थ राहतात त्यांच्यासाठी बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीने पक्के रस्ते, स्ट्रीट लाईट, पिण्याचे पाण्याचे दोन हातपंप, अंगणवाडी अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. लहान मुलांना शाळेत येणे जाणे करीता शाळा सुद्धा जवळ आहे, तरी येथील लोकांना बेघर करण्याचा प्रयत्न टिळकनगर मळ्याच्या अधिकार्‍यांकडून होत आहे.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्यादित टिळकनगर मळ्यावरील सुभाषवाडी-आझादवाडी येथे गेली 50 ते 60 वर्षापासून शेती महामंडळाचे कामगार कुटुंबिय राहत आहेत. सुमारे 30 ते 40 कुटुंब शेतमजुरी, रोजंदारी, करून आपल्या कुटुंबाचा उदर्निवाह करीत आहे. आर्थिक परिस्थिती नाजुक असल्याने आम्हाला आहे त्याच ठिकाणच्या खोल्या आणि जागा देण्यात यावी, अशी मागणी येथील रहिवाश्यांनी केली आहे.

महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, तहसीलदार, प्रांत अधिकारी, बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पुणे, शेती महामंडळ टिळकनगर मळ्याचे अधिकारी यांच्याकडे जागेसंदर्भात प्रश्न मार्गी लावावा यासाठी आम्ही वेळोवेळी मागणी केलेली आहे. पण आमची दखल न घेता शेती महामंडळाच्या टिळकनगर मळ्याच्या अधिकार्‍यांनी खोल्यांचा जाहीर लिलाव करायचा निर्णय घेतला आहे. यामुळे संतापाचे वातावरण पसरले आहे.

जोपर्यंत आमची हक्काची राहण्याची सोय होत नाही तोपर्यंत आम्ही एकही खोलीचा जाहीर लिलाव होवू देणार नाही. येथील एक सुद्धा विट आम्ही उचलू देणार नाही. वेळ प्रसंगी आम्ही टिळकनगर मळ्यावरील शेती महामंडळ कार्यालयास टाळे ठोकू तसेच आमच्या समस्यांचा विचार केला गेला नाही तर आम्ही कुटुंबासह उपोषणास बसण्याचा इशारा भाजपचे बुथ प्रमुख कैलास त्रिभुवन व शिवदास म्हसे, किशोर पगारे, सुनील मंडलिक, संजय पाडाळे, राहुल मोरे, सोनु जाधव, कैयुम शेख, योगेश गायकवाड, सचिन जाधव, आयुब शेख, संतोष खाजेकर, शाम मंडलिक, अविनाश केदारे, मनोज जाधव, धनंजय चव्हाण, राजू ददरे, रावसाहेब भारस्कर, गोविंद सोनवणे यांच्यासह या भागातील रहिवाश्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com