शेती महामंडळ मळ्यावर मूग व मका जोरात

शेती महामंडळ मळ्यावर मूग व मका जोरात

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

महाराष्ट्र सरकारचा अंगीकृत व्यवसाय असलेल्या महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या चांगदेवनगर ऊस मळ्यावर संयुक्त शेती उपक्रमाअंतर्गत अंदाजे 496 एकरांत कराराने घेतलेल्या शेतकर्‍यांनी या जमिनीत सोयाबीन, तूर, मका, मूग यासारखी खरीप पिकांची पेरणी केली आहे. 12 वर्षे पडित असलेल्या जमिनीत निसर्गाने वेळेवर साथ दिल्यामुळे सर्वच पिके चांगली बहरली आहेत.

विशेष ऊस मळ्यावर मूग व सोयाबीन पिकांचे प्लॉट पाहण्यासारखे असून सयुंक्त शेती उपक्रमामुळे पडित जमिनीवर मशागत सुरू होऊन पिके घेणे सुरू झाल्यामुळे परिसरातील अनेकांना रोजगार मिळाला आहे. चांगदेवनगर मळ्याची स्थापना 25 जुलै 1963 रोजी झाली होती. मळ्यावर 2788 एकर क्षेत्र होते गोदावरी उजव्या कालव्याच्या पाटपाण्यामुळे ह्या मळ्यावरील अंदाजे 75 % क्षेत्रावर उसाची लागवड केली जात होती. त्यामुळे मळ्यांना ऊस मळे म्हणून संबोधले जात होते.

मात्र खंडकरी शेतकर्‍यांना 2011-12 मध्ये 2032 एकर जमिनीचे वाटप झाले त्यामुळे चांगदेवनगर मळ्यावर अंदाजे 756 एकर क्षेत्र शिल्लक राहिले असून त्यापैकी चालू वर्षी 496 एकर क्षेत्र संयुक्त शेती उपक्रमाअंतर्गत कराराने दिले असून ह्या क्षेत्रावर खरीप पिके चांगलीच जोमात आहेत. येथील जळगाव-पुणतांबा शिव रस्त्यालगत प्लॉट नं.1मध्ये अंदाजे 75 एकर क्षेत्रात कांदा, मूग, सोयाबीन, तूर, मका ह्या पिकांची पेरणी केली आहे.

पाच एकरांत लावलेल्या मुगाच्या शेंगा काढण्याचे काम कालपासून सुरू झाले असून अंदाजे 50 स्त्री मजूर किमान 200 रू. रोजंदारीवर शेंगा काढत आहेत. उसाच्या प्लॉटमध्ये खरीप पिके जोमाने आल्याबद्दल शेती करणारे श्री. पाराजी वरखड व रविशंकर जेजूरकरसह त्यांच्या सहकार्‍यांनी तसेच एकेकाळी महामंडळाच्या मळ्यावर कायम कामगार म्हणून काम करणार्‍या स्त्री मजुरांनी सुध्दा समाधान व्यक्त केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com