
कोपरगाव (प्रतिनिधी) - करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे जीवनावश्यक वस्तुच्या दुकानांसह कृषी सेवा केंद्र तसेच शेतीपुरक व्यवसायाची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू असतात. ही वेळ शेतकरी बांधवांसाठी गैरसोयीची असल्याने सदरच्या वेळेत वाढ करून दुपारी 2 वाजेपर्यंत कृषी सेवा केंद्रासह शेतीपुरक व्यवसायाची दुकाने सुरू ठेवण्यात यावी, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
निवेदनात सौ. कोल्हे म्हणाल्या, करोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनेअंतर्गत निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानासह शेतीपुरक व्यवसायाची दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू असतात. सदरची वेळ ही शेतकरी बांधवांच्या दृष्टीने गैरसोयीची आहे. प्रामुख्याने शेतकरी बांधवाचा जोडधंदा असलेल्या दुग्धव्यवसायाची धावपळ याच वेळेत असते. या वेळेमध्ये ही कामे आटोपण्यापर्यंत सकाळचे 10 वाजतात. सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असुन पेरणीचा काळ आहे, शेती मशागती बरोबर अन्य कामेही सुरू आहेत. यासंदर्भात विविध साहित्याची खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधवांना ग्रामीण भागातून शहरापर्यंत येण्यास वेळ लागतो.
तो पर्यंत बाजारपेठ बंद होण्याची वेळ होते. दुकाने बंद होतात, दुकाने बंद झाल्यामुळे त्यांना विनाकामाचेच माघारी जावे लागते. वेळेसह त्यांचा येण्या जाण्याचा खर्च वाया जात असल्याने शेतकरी बांधवांच्या दृष्टीने ही वेळ गैरसोयीची असून शेतीपूरक साहित्याची खरेदी करता येत नाही. त्यामुळे मोठी कुचंबणा होत आहे.
सर्व परिस्थितीचा विचार करता शेतकरी बांधवासाठी शेतीपुरक व्यवसायाची दुकाने दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवल्यास शेतकरी बांधवाची होणारी गैरसोय टाळता येईल. यासंदर्भात गांभीर्याने विचार करून जिल्हाधिकार्यांनी तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी सौ. कोल्हे यांनी केली आहे.