Agricultural News : खरीप पिकांवरील गोगलगाय किडीचे वेळीच नियंत्रण करा, कृषी विज्ञान केंद्राचा सल्ला
लोणी । वार्ताहर
राहाता, संगमनेर, श्रीरामपूर आणि राहुरी या तालुक्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी खरीप पिकांची पेरणी झालेली आहे अशा पिकांवर सध्या गोगलगाय किडीचा प्रादुर्भाव आढळुण येत असल्याचे निदर्शनात आले आहे. या गोगलगायी सध्या सोयाबीन, मका, कापुस तसेच भाजीपाला पिकाचे नुकसान करत असल्याचे दिसून येत आहे. या गोगलगाय किडीचा योग्य वेळेतच बंदोबस्त करावा असे आवाहन बाभळेश्वरच्या कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. केंद्राचे पिक संरक्षण विभागाचे प्रमुख भरत दवंगे यांनी या किडीचा जीवनक्रम, नुकसानीचा प्रकार आणि उपाययोजना याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.
गोगलगायींच्या जीवनक्रमात अंडी, पिल्ले आणि पूर्ण वाढलेल्या गोगलगायी या तीन अवस्था असतात. मादी गोगलगाय एका वेळी १००० ते १५०० अंडी पुंजक्याने घालते. एका अंडी पुंजामध्ये १०० ते १५० अंडी असतात. साधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीला २-३ पावसाच्या सरी पडल्यानंतर ही अंडी घातली जातात. अंडी रात्रीच्या वेळी घातली जातात आणि ५-७ दिवसांनतर ही अंडी फुटून त्यामधून गोगलगायींची छोटी पिल्ले बाहेर पडतात. ही पिल्ले लहान पानांवर आपली उपजीविका करतात. जसजशी या पिल्लांची वाढ होऊ लागते तसतसा त्यांच्या पाठीवरील शंकाचा आकार वाढत जातो. साधारणपणे २ वर्षात या पिल्लांची वाढ पूर्ण होते आणि त्यानंतर पूर्ण वाढ झालेल्या गोगलगायी पून्हा २-३ वर्ष जगतात. एकंदरीत गोगलगायींचा जीवनकाळ ४-५ वर्षांचा असतो.गोगलगायींचा प्रादूर्भाव विशिष्ट हवामान असल्यासच जास्त वाढतो. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या एक दोन महिन्यांमध्ये ज्यावेळी वातावरनातील आर्द्रता ८० टक्क्यांपर्यंत असते आणि तापमान २५ ते ३० सें. ग्रे. असते अशावेळी त्यांची संख्या खुप वाढते. शक्यतो ओढ्याच्या किंवा नाल्याच्या कडेने, कॅनॉलच्या शेजारी तसेच दलदलीच्या ठिकाणी गोगलगाईचा प्रादुर्भावजास्त असल्याचे दिसून येते.
या गोगलगायी पिकांच्या उगवणाऱ्या रोपट्यांची लहान पाने खाण्यास सुरूवात करतात. सोयाबीनसारख्या पिकामध्ये तर लहान रोपांवर आणि त्यानंतर मोठ्या वाढलेल्या झाडांचीही पाने आणि देठ कुरतडून खातात. त्यामुळे पेरणीनंतर उगवून आलेली रोपटेच खाऊन घेतल्यास शेतात रोपांची योग्य संख्या राहत नाही आणि उत्पादनांत मोठी तफावत पडते. भाजीपल्यामध्ये देखील कोबी, फ्लॉवर, पालेभाज्या, वांगी, भेंडी, वेलवर्गीय भाजीपाला, मिरची, टोमॅटो यांची रोपे या गोगलगायी खाऊन टाकतात. त्याचप्रमाणे फळे आणि फुलझाडांवरही त्या आपली उपजीविका करतात. ग्लिरीसिडीया किंवा गिरीपुष्प हे या गोगलगायींचे आवडते खाद्य असल्यामुळे ज्या ठिकाणी गिरीपुष्पाची झाडे असतात. अशा ठिकाणी गोगलगायींचा प्रादूर्भाव खुप असतो. एकंदरीत खरीप हंगामातील कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला, आणि फळपिकांचे रोपे आणि त्यानंतरही त्यांचे पाने खाऊन गोगलगायी मोठे आर्थिक नुकसान करतात. पूर्ण वाढलेल्या गोगलगायींच्या शरीरावर शंख असल्यामुळे त्या स्वतःचे संरक्षण करू शकतात. त्यामुळे त्यांचे पूर्ण नियंत्रण करणे जरी शक्य नसले तरी त्यांची संख्या आपण मोठ्याप्रमाणात कमी करू शकतो. त्याकरीता त्यांच्या पिल्लांचे नियंत्रण करतांना काही उपाय योजना करणे गरजेचे आहे. या गोगलगायींचे एकात्मिक पध्दतीने नियंत्रण करण्यासाठी पुढील प्रमाणे अवलंब करावा असे आवाहन दवंगे यांनी केले आहे.
शेतीमध्ये गोगलगायींचा प्रादूर्भाव दिसू लागल्याबरोबर मेटालडिहाईड नावाचे औषध प्रती एकरी दोन किलो या प्रमाणात बांधाच्या कडेने आणि पिकामधील मोकळया जागेमध्ये किंवा वरंब्यावर टाकावे. हे मेटालडिहाईड गोगलगायी आवडीने खातात आणि खाल्यानंतर काही तासांमध्येच त्या मरतात. सोयाबिन, लसूणघास किंवा भाजीपाल्यांमध्ये मोकळ्या जागेमध्ये गवताचे ढिग किंवा रिकामी पोती ओली करून टाकवीत, या गवताच्या ढिगांखाली किंवा पोत्यांखाली सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात गोगलगाई जमा होतात. अशा पध्दतीने एकत्रितपणे जमा झालेल्या गोगलगाई किटकनाशकाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. तसेच गोगलगाईच्या नियंत्रणासाठी विषारी अमिषाचासुध्दा वापर करता येतो. त्यासाठी गव्हाचा भुस्सा, गुळ अधिक किटकनाशक यांचे विषारी आमिष तयार करुन ते शेतामध्ये टाकावे. त्याकरीता गव्हाचा भुस्सा १०० किलो घेवून २०० लीटरच्या पाण्याच्या टाकीमध्ये भिजण्यासाठी टाकावा. त्यामध्ये २ किलो गुळाचे पाणी टाकावे. सदर भुस्सा रात्रभर भीजू द्यावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामध्ये ५० ग्रॅम इमामेक्टीन बेंझोएट हे किटकनाशक टाकावे. अशा प्रकारे तयार केलेले विषारी आमिष दिवस उगवण्यापूर्वी शेतामध्ये मोकळ्या जागेत ठिकठिकाणी टाकावे आणि त्यावर ओली पोती टाकावीत. हा भुस्सा खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोगलगाई पोत्यांखाली जमा होतात आणि हा विषारी भुस्सा खाऊन मरतात. अशा पद्धतीने मेटालडिहाईडचा वापर करणे, शेतामध्ये ओली पोती टाकणे, ठिकठिकाणी गवताचे ढिग करणे आणि गरज भासल्यास विषारी आमिष तयार करुन शेतामध्ये टाकणे अशा एकात्मिक पद्धतींचा अगदी वेळेवर अवलंब केला तरच गोगलगायींचे यशस्वी नियंत्रण करता येणे शक्य आहे. अधिक माहीतीसाठी कृषि विज्ञान केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.