कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू होण्यापूर्वीच अर्ज स्वीकृती
सार्वमत

कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू होण्यापूर्वीच अर्ज स्वीकृती

Arvind Arkhade

श्रीगोंदा|तालुका प्रतिनिधी|Shrigonda

राज्यातील शेतकर्‍यांना कृषी विभागामार्फत शेती पूरक अवजारे 50 टक्के अनुदानवर दिली जातात. यासाठी कृषी विभागामार्फत अर्ज स्वीकृती केली जाते. मात्र ही कृषी यांत्रिकीकरण योजना अजून सुरू झाली नसताना काही सेतू चालक या योजनेचे ऑनलाइन अर्ज शेतकर्‍यांकडून भरून घेत आहेत.

मात्र ही योजना सुरू झाली नसल्याने केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नसल्याने शेतकर्‍यांना आर्थिक नुकसान होणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांसाठी अनुदान तत्त्वावर पेरणी यंत्र, ट्रॅक्टर, रोटर, फवारणी यंत्र अशी अवजारे घेण्यासाठी दरवर्षी अर्ज मागवण्यात येत असतात. आलेल्या अर्जांमधून सोडत पद्धतीने लाभार्थी निवडले जातात. मात्र यावर्षी अजून कृषी विभागाने कृषी यांत्रिकीकरण योजना सुरूच केलेली नाही. ती कधी सुरू होणार याबाबत अजून कृषी मंत्रालयाने काही जाहीर केले नाही.

कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेची अजून सरुवात झाली नसताना काही सेतू सुविधा केंद्रांत शेतकर्‍यांच्या विविध लाभाच्या योजनांसाठी अर्ज भरून घेतले जात आहेत.अजून कुठलाही आदेश नसताना जे अर्ज केले जात आहेत, त्यांची दखल कृषी विभाग घेणार नसताना शेतकर्‍यांना या लाभाच्या योजनांचा लाभ तर मिळणार नाहीच; मात्र आर्थिक फटका बसणार आहे. सेतू चालक यासाठी कागदपत्रे जमा करून घेत आहेत. यासाठी पैसेही घेत आहेत. मात्र अजून योजना सुरू करण्यात आलेली नाही.

सेतुचालक कृषी अवजारे खरेदीसाठी अर्थसाहाय्य योजनेत अर्जही भरून घेत आहेत. परंतु कृषी विभागामार्फत फक्त योजनेचे पोर्टल लाँच केलेला आहे. कोणतेही टार्गेट नाही. त्यामुळे अर्ज भरून घेऊ नये. सीएससी केंद्र चालकांना स्पष्ट निर्देश असून जर शेतकर्‍यांनी अर्ज केला तर तो बाद होतो आणि त्याचे पैसे परत मिळत नाहीत. याला सर्वस्वी सीएससी सेंटर जबाबदार राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि तशी कल्पना सीएससी आणि शेतकर्‍यांना देण्यात यावी असे तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी सांगितले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com