कृषी पदवीधर कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्या मान्य करा
सार्वमत

कृषी पदवीधर कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्या मान्य करा

अन्यथा 16 ऑगस्टपासून लेखणीबंद ठिय्या आंदोलन

Arvind Arkhade

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कृषी पदवीधर कृषी सहाय्यकांवर अन्याय होत आला असून 2018 च्या अधिसुचनेला स्थगिती देऊन त्यामध्ये नव्याने सुधारणा करावी. आदी अनेक मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर अराजपत्रीत तांत्रीक कर्मचारी संघटनेच्यावतीने कृषीमंत्री दादा भुसे व कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांना विविध निवेदन देण्यात आले.

सदर मागण्यांकडे सकारात्मकपणे न पाहिल्यास संघटनेच्यावतीने 16 ऑगस्टपासून काळ्या फिती लावून, ठिय्या आंदोलन करत लेखणी बंद, कामबंद आंंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष दीपक बोर्डे यांनी दिली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात 29 जानेवारी 2018 च्या अधिसुचनेमुळे कृषी पदवीधर कृषी सहाय्यकांवर अन्याय होत आला असून या अधिसुचनेला स्थगिती देऊन नव्याने सुधारणा करावी, कृषी सहाय्यकांना कृषी पर्यवेक्षक पदावर पदोन्नती देताना 70 : 30 या प्रमाणातील 70 टक्के प्रमाणामध्ये 80:20 असे कृषी पदवीधर व कृषी पदविका प्रमाण ठेवण्यात यावे, महाराष्ट्र राज्यात कृषी पर्यवेक्षक संवर्गाची 30 टक्के सरळसेवेची साधारणपणे 450 पदे रिक्त असून सदरची पदे विभागीय मर्यादीत परीक्षेने न भरता ती रिक्त पदे मूळ कृषी पदवीधर कृषी सहाय्यकांच्या सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यात यावी.

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची मान्यता असणार्‍या कृषी पदवीधरांना तसेच कृषी सहाय्यकांना कृषी पर्यवेक्षकसाठी संधी मिळावी, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे कृषी सेवकांना 21000 रुपये वेतनश्रेणीत घेण्यात यावे, तसेच कृषी सेवकांचा कालावधी कमी करून एक वर्ष करण्यात यावा, कृषी सहाय्यक पदाचे पदनाम सहाय्यक कृषी अधीकारी करण्यात यावे, अंतर संभागीय बदली करताना कृषी पर्यवेक्षक पदावर पदोन्नती झाल्यानंतर किमान 6 वर्षांची समय मर्यादा त्याच संभागात देण्यात यावी, त्यामुळे कोणत्याही संभागातील सेवा ज्येेष्ठतेवर परिणाम होणार नाही.

कृषी सहाय्यक हे तांत्रीक पद असल्याने सदर पदावर ग्रेड वन मजूर, रोपवाटीका मदतनिस, व तत्सम (7 वी, 10 वी पास) कमी शैक्षणिक पात्रता असणार्‍या कर्मचार्‍यांना कृषी सहाय्यक पदावर 10 टक्के कोट्यातून पदोन्नती देण्यात येऊ नये. कृषी सहाय्यक संवर्गाची सर्व विभागांमध्ये पदोन्नतीसाठीही बिंदू नामावलीमध्ये योग्य सुधारणा करण्यात याव्यात, सर्व संभागातील बिंदूनामावलीत अनंत त्रुटी असून त्यामुळे कृषी सहाय्यकांची पदोन्नती रखडली जाते.

त्यामुळे कृषी सहाय्यकांना त्याच पदावर 25 ते 30 वर्षे सेवा करावी लागते. किंवा त्याच पदावर सेवानिवृत्त व्हावे लागते. तरी सर्व संभागातील कृषी सहाय्यक पदाच्या बिंदूनामावलीत योग्य त्या सुधारणा करून अद्ययावत करताना कृषी सहाय्यकांना विश्वासात घेऊन वेळोवेळी अवगत करण्याचे आदेश संबंधित अधीकार्‍यांना आपल्या स्तरावर निर्गमीत करण्यात यावे.

वरील मागण्या महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर अराजपत्रीत तांत्रीक कर्मचारी संघटनेच्यावतीने अध्यक्ष दीपक बोर्डे यांनी केल्या आहेत. दरम्यान मागण्या मान्य न केल्यास दि. 16 ऑगस्टपासून काळ्या फिती लावून, ठिय्या आंदोलन करत लेखणी बंद, कामबंद आंंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष दिपक बोर्डे यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com