शेतीव्यवसायात नवनवीन आव्हाने - अरूण तनपुरे

राहुरीत बाजार समितीच्या वतीने 14 ला कृषी प्रदर्शन
शेतीव्यवसायात नवनवीन आव्हाने - अरूण तनपुरे
अरुण तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

दिवसेंदिवस अवघड होत चाललेल्या शेती व्यवसायात या स्पर्धेच्या युगात दररोज नवी आव्हाने उभी राहत आहेत. यापुढील काळात आधुनिक पद्धतीने व खर्च कमी करून उत्पन्न वाढविले तरच शेती टिकेल. वारंवार येणार्‍या नैसर्गिक आपत्ती दुष्काळ, अवकाळी पाऊस व वातावरणात होणारे बदल यातून शेती व्यवसाय अत्यंत धोक्यात आला असताना या दुष्टचक्रातून शेतकरी वाचला पाहिजे व त्यास आधुनिक शेती पद्धतीची माहिती मिळाली पाहिजे. या उद्देशातून राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दि. 14 एप्रिल ते 18 एप्रिल यादरम्यान राहुरी शहरातील नगर-मनमाड रोडलगत वायएमसीए मैदानावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डिसेंबर मध्येच हे प्रदर्शन घेण्यात येणार होते. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलत गेल्याने राहुरीचे ग्रामदैवत श्री खंडेरायाच्या यात्रा व प्रदर्शन असा दुहेरी योग साधण्याचा प्रयत्न करण्याचा मानस श्री. तनपुरे यांनी व्यक्त केला. या प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, पणन विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ व महसूल विभागाचा सहभाग असून दोनशे स्टॉल्स, विविध अवजारे, नवनवीन तंत्रज्ञान तसेच गृहोपयोगी वस्तूंची दालने व बचत गटांचे महिलांचे स्टॉल असून वाबळे इव्हेंट्स या प्रदर्शनाचे नियोजन करणार आहेत.

प्रदर्शनादरम्यान डाळिंब शेती जमिनीचे खराब होत चाललेले आरोग्य व ऊस पीक मार्गदर्शन याबाबत तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शनाचे तीन दिवस परिसंवाद होणार आहेत.

कर्नाटक येथील दीड टन वजनाचा रेडा, कृषी अवजारे, ठिबक सिंचन, ड्रोनद्वारे औषध फवारणी आदी नवनवीन तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून केला जाणार आहे. महसूल विभागाकडून शेती साठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असून त्याचप्रमाणे शासनाचा कृषी विभाग, पणन विभाग व कृषी विद्यापीठाचे अधिकारी शासनाच्या विविध योजनांबाबत शेतकर्‍यांना माहिती देणार आहेत.

नवनवीन कृषी अवजारे, हार्वेस्टिंग यंत्र, जैविक कीटकनाशके, डेअरी व्यवस्थापन, मत्स्य व्यवस्थापन, पोल्ट्री शेळीपालन, शेततळे विषयी माहितीबरोबरच कृषी मार्गदर्शक पुस्तके, नवनवीन बियाणांची माहिती, सोलर उपकरणे, यापूर्वी शेती प्रदर्शन मोठ्या शहरात भरत असल्याने शेतकर्‍यांना तेथे पोहोचणे शक्य नव्हते. बर्‍याच अडचणी शेतकर्‍यांसमोर असल्याने ग्रामीण भागातच शेतकर्‍यांसाठी प्रदर्शन घेण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे.

या प्रदर्शनासाठी जास्तीत जास्त कृषी अवजारे कंपन्या, बियाणे व इतर तंत्रज्ञांनी सहभाग नोंदवून शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अरुण तनपुरे यांनी केले. यावेळी बाजार समितीचे संचालक अरुण कल्हापुरे, ताराचंद तनपुरे, दीपक तनपुरे, रावसाहेब शंकर तनपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.