Video : अकोले तहसील कार्यालयावर जोरदार आंदोलन

अकोले | प्रतिनिधी

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील कोव्हिड सेंटर व खासगी दवाखान्यांना मिळणार्‍या तुटपुंज्या सुविधा व रेमडेसिवीर इंजेक्शन, औषध आणि ऑक्सिजनच्या वाटपात दुजाभाव व तुटवड्याच्या निषेधार्थ काल शनिवारी दुपारी अकोले तहसील कार्यालयावर माकपचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली योग्य ती खबरदारी घेत सर्वपक्षीय कार्यकर्ते व वैद्यकीय, मेडिकल व प्रयोगशाळा व्यासायिकांनी जोरदार आंदोलन केले.

दरम्यान प्रशासनाने हस्तक्षेप करून पुरेसे रेमडेसिवीर, ऑक्सिजन, औषधे पुरविण्याची व्यवस्था करावी अन्यथा येणार्‍या दोन दिवसांत तालुक्यातील जनता आता हे सहन करणार नाही, वेळप्रसंगी सर्वच शासकीय कार्यालयांना टाळे ठोकत आंदोलन केले जाईल अशा प्रकारची ठोस भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली.

यावेळी आ. डॉ. किरण लहामटे यांनी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्याशी स्पीकर सुरू ठेऊन बोलणी केली मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आमदार लहामटे यांनी थेट पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना फोन करत अकोलेवर सुरू असणार्‍या अन्यायकारक भूमिकेबाबत माहिती सर्वांसमोर मोबाईल स्पीकर सुरू ठेऊन दिली. येत्या 2 दिवसांत यात सुधारणा केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी आमदारांना दिले.

अकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोना बधितांची संख्या वाढत असून त्या तुलनेत आरोग्य सुविधा तुटपुंज्या आहेत. 15 एप्रिल रोजी 482 उपलब्ध रेमडेसिवीर इंजेक्शन पैकी संगमनेर तालुक्याला 472 इंजेक्शन देण्यात आली तर अकोलेला फक्त 10 इंजेक्शन मिळाले. सातत्याने अकोले तालुक्यावर असा अन्याय होत असल्यामुळे माकपचे नेते डॉ. अजित नवले यांनी समाज माध्यमातून आजच्या आंदोलनाची हाक दिली होती.

सर्वपक्षीय कार्यकर्त्यांबरोबरच वैद्यकीय व्यावसायिक, औषध विक्रेते, प्रयोगशाळा संचालक या आंदोलनात सहभागी झाले होते. तहसील कार्यलयासमोर झालेल्या ठिय्या आंदोलनात अनेकांनी करोना रुग्णांची त्यांच्या नातेवाईकांची होत असणारी ससेहोलपट, तालुक्यातील आरोग्य सुविधांची दुरवस्था, रेमडेसिवीर व ऑक्सिजन पुरवठ्याबाबत तालुक्यावर होत असलेला अन्याय याबाबत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. तालुक्याच्या ऑक्सिजन पुरवठादारावर काळा बाजार करीत असल्याचा आरोप करीत त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या दरम्यान डॉ. लहामटे यांनी प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधला व त्यांना आंदोलनाची माहिती दिली. मात्र प्रांताधिकारी यांचेकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. दरम्यान हे संभाषण ऐकत असणारे आंदोलक यामुळे अधिकच संतप्त झाले. प्रांताधिकर्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे देत आमदारांचा पर्यायाने तालुक्याचा अपमान केला असल्याचा आरोप करीत त्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्या बदलीची मागणी करण्यात आली. शेवटी डॉ. लहामटे यांनी पालकमंत्र्यांशी संपर्क केला. त्यांनी 2 दिवसांत प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी डॉ. अजित नवले, ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, शिवसेनेचे नेते महेश नवले, काँग्रेसचे नेते मिनानाथ पांडे, विनय सावंत, डॉ. संदीप कडलग, सुरेश नवले, विलास आरोटे, शंभू नेहे, सचिन शिंदे आदींनी मनोगते व्यक्त केली. तहसीलदार मुकेश कांबळे यांनी करोनाच्या संदर्भात तालुक्यात सुरू केलेले काम प्रशंसनीय असल्याचे यावेळी डॉ. नवले यांनी सांगितले.

या आंदोलनात सेवानिवृत्त प्रशासक बी. जे. देशमुख, राष्ट्रवादीचे अध्यक्ष भानुदास तिकांडे, युवक अध्यक्ष रवी मालुंजकर, काँग्रेस चे अध्यक्ष दादापाटील वाकचौरे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नाईकवाडी, रोहिदास धुमाळ, संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ नवले, अकोलेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक सचिन शेटे, परशूराम शेळके, सेनेचे शहर प्रमुख नितीन नाईकवाडी, मेडिकल असो.जिल्हा पदाधिकारी बाळासाहेब भोर, रमेश आरोटे, काँग्रेसचे विलास आरोटे, अ‍ॅड. के. बी. हांडे, बाळासाहेब नाईकवाडी, आरिफ तांबोळी, सर्वपक्षीय कार्यकर्ते, डॉक्टर्स असोसिएशन, मेडिकल व्यावसायिक, प्रयोगशाळा व्यावसायिक आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक अभय परमार व उपनिरीक्षक दीपक ढोमने यांनी बंदोबस्त ठेवला होता.

Title Name
नवाब मलिकांच्या 'त्या' खळबळजनक आरोपांवर केंद्रीय मंत्र्यांचं प्रत्यूत्तर
Video : अकोले तहसील कार्यालयावर जोरदार आंदोलन
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com