‘अगस्ती’ यंदा चार ते साडेचार लाख टन उसाचे गाळप करणार - गायकर

‘अगस्ती’ यंदा चार ते साडेचार लाख टन उसाचे गाळप करणार - गायकर

अकोले |प्रतिनिधी| Akole

अगस्ती सहकारी कारखाना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. अनेक अडथळे, अडचणींवर मात करीत यंदाच्या गळीत हंगामाची तयारी सुरू असून चार ते साडे चार लाख टन उसाचे गाळप कुठल्याही परिस्थितीत करणार असल्याचे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनी म्हटले आहे.

अगस्ती कारखान्याचे 35 व्या हंगाम पूर्व रोलर पूजन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून गायकर बोलत होते. अगस्ती सहकारी कारखान्याच्या 35 व्या गळीत हंगाम पूर्व रोलर पूजन जिल्हा बँकेचे संचालक मधुकरराव नवले, भाकपचे ज्येष्ठ नेते कारभारी पा. उगले, माजी संचालक कचरू पा. शेटे, शिवसेना तालुकाध्यक्ष डॉ. मनोज मोरे, खरेदी विक्री संघचे चेअरमन प्रकाश नाईकवाडी, ज्येष्ठ संचालक मीनानाथ पांडे, नगरसेवक नवनाथ शेटे व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यापीठावर व्हा. चेअरमन सुनीताताई भांगरे, संचालक मच्छिंद्र धुमाळ, प्रदीप हासे, अशोक आरोटे, मिनानाथ पांडे, परबत नाईकवाडी, मनोज देशमुख, सचिन दराडे, सुधीर शेळके, विकास शेटे, विक्रम नवले, सदाशिव साबळे, माजी चेअरमन प्रकाश मालुंजकर, माजी संचालक बाळासाहेब ताजणे, बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, भाकपचे कारभारी उगले, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश नवले, कार्यकारी संचालक सुधीर कापडणीस, सर्व संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, कामगार, शेतकरी, सभासद उपस्थित होते.

श्री. गायकर म्हणाले, अगस्ती बरोबरच जिल्ह्यातील सर्वच अडचणीतील कारखान्यांना जिल्हा बँकेने कर्ज दिले आहे.हा गळीत हंगाम अत्यंत अडचणीचा आहे. परंतु त्यावर आपल्या सर्वांच्या मदतीने मार्ग काढायचा आहे. गेल्या हंगामाचे एफ आर पी चे शेतकर्‍याचे पेमेंट देणे बाकी असून ते आपण दिवाळीत देण्याचे नियोजन आहे. हंगामाची सर्व तयारी पूर्ण होत आली आहे. पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध असेल. शेतकर्‍यांना बांधावर बेणे उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यंदाच्या वर्षी 86.0.32 तसेच 18.121 हे बेणे उपलब्ध करून दिले. अगस्तीच्या कार्यक्षेत्रात ऊस वाढीचा आपला प्रयत्न असून त्यादृष्टीने आम्ही सर्व संचालक मंडळ प्रयत्न करीत आहे.

जिल्हा बँकेचे संचालक मधुकरराव नवले म्हणाले, अगस्ती कारखान्याने अत्यंत चिकाटीने आणि नियोजनपूर्वक काम केले तर अगस्तीचे कर्ज वाढणार नाही. किंबहूना ते कमी झाले नाही तरी चालेल पण ते वाढू तरी देऊ नका असे सांगतानाच शिस्त असणे फार गरजेचे आहे. यावेळी त्यांनी काही सूचना देखील केल्या. तसेच जिल्हा सहकारी बँकेचे अल्प मुदतीचे कर्ज दीर्घ मुदतीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून त्यात यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी कारभारी उगले, भानुदास तिकांडे, डॉ. मनोज मोरे यांची भाषणे झाली. प्रास्तविक संचालक मिनानाथ पांडे यांनी केले तर स्वागत व सूत्रसंचालन संचालक विकास शेटे यांनी केले.आभार संचालक सदाशिव साबळे यांनी मानले.

आशेचा किरण...

अगस्ती कारखाना हा पहिल्यापासून अडचणीत आहे. कर्ज नवे-जुने करीत चालवला आहे, परंतु आता तो स्वयंपूर्ण करायचा असून केंद्र सरकारच्या एन डी सी सी चे 75 कोटींचे दीर्घ मुदतीचे कर्ज मिळाले तर वाटचाल सोपी होणार असल्याने आमचे ते प्रयत्न सुरू असून योगायोगाने राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित दादा पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अगस्तीला मदत करणार असल्याचे सांगितल्याने आशेचा किरण दिसू लागला असल्याचे सीताराम पा. गायकर यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com