अगस्ति कारखाना रस्त्यासाठी सर्वपक्षीयांचेे दीड तास रास्ता रोको

अगस्ति कारखाना रस्त्यासाठी सर्वपक्षीयांचेे दीड तास रास्ता रोको

अकोले |प्रतिनिधी| Akole

अगस्ति सहकारी साखर कारखाना रस्त्याच्या दयनीय अवस्थेच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या कारखाना रस्त्यावरील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांच्यावतीने सुमारे दीड तास महात्मा फुले चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत लवकरच सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम, नगरपंचायत, कारखाना यांची एकत्रित बैठक आयोजित करून याप्रश्नी मार्ग काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

अकोले शहरापासून अगस्ति कारखाना रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. दरवर्षी कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्यावर प्रचंड धूळ उठत असते. त्यामुळे रस्त्याच्याकडेला राहणार्‍या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असते. तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांचे व नगरपंचायत निधीतून कारखाना रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दुचाकी व चारचाकी वाहतूक सुरू असते, त्यातच पावसाळ्यात परिसरातील ओढे, नाल्यांचे पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत असते. त्यामुळे रस्त्यावर असंख्य खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होत असते.दरवर्षी रस्त्याची डागडुजी केली जाते मात्र पावसाळ्यात पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत असते. सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिक नेहमीच्या त्रासाने त्रस्त झाल्याने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

कारखाना रस्त्यावरील सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक काल याप्रश्नी एकत्रित आले व त्यांनी अकोले-संगमनेर रस्त्यावरील महात्मा फुले चौकात रस्ता रोको आंदोलन केले. सुमारे दीड तास हे आंदोलन सुरू राहिल्याने रस्त्याच्या दुतर्फा मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, नगरसेवक नवनाथ शेटे, शिक्षक घनश्याम माने, युवक कार्यकर्ते अनिल शेटे, काँग्रेसचे युवा नेते बाबासाहेब नाईकवाडी, प्रशांत जगताप, संदीप शेणकर, मच्छिंद्र शेणकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या प्रश्नी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेंद्र वाकचौरे, आदींनी रस्त्या संदर्भात माहिती दिली व रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा करू, असे सांगितले.

उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांनी कारखाना रस्त्याच्या काँक्रीटीकरनासाठी 12 कोटीचे अंदाजपत्रक नगरपंचायतच्या वतीने तयार करण्यात आले असून नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आले आहे. हे काम दोन टप्यात मार्गी लागले जाईल, असे आश्वासन दिले.

कारखान्याचे उपाध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांनी लवकरच आमदार डॉ. लहामटे यांच्या उपस्थितीत जि. प. सार्वजनिक बांधकाम विभाग,कारखाना, नगरपंचायत यांची एकत्रित बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. निवासी नायब तहसीलदार टी. एन. महाले यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.

या आंदोलनात सेनेचे शहर प्रमुख नितीन नाईकवाडी, भाजप चे शहर अध्यक्ष सचिन शेटे, बांधकाम समितीच्या सभापती सौ.वैष्णवी धुमाळ, नगरसेविका सौ.माधुरी शेणकर, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, सेनेचे नेते प्रदीप हासे, डॉ. मनोज मोरे, भाजपचे ज्येष्ठ नेते संदीप शेटे, रविंद्र शेणकर, बबन नाईकवाडी,संदेश शेटे, भाऊराव शेणकर,संचित कोटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भागवत शेटे, दत्तात्रय नाईकवाडी, बुवासाहेब नवले पतसंस्थेचे संचालक रघुनाथ शेणकर, रमेश नाईकवाडी, अनिल गायकवाड, विशाल शेणकर,संतोष देठे आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com