‘अगस्ती’साठी पिचड विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू

एकीचा नारा देत रूंभोडीतील बैठकित सत्ताधार्‍यांवर टीका
अगस्ती कारखाना
अगस्ती कारखाना

इंदोरी |वार्ताहर| Indori

अगस्ती कारखान्याच्या संभाव्य निवडणुकीत माजीमंत्री व विद्यमान अध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्या

विरोधात येत्या निवडणुकीत अगस्तीची सत्ता सर्वसामान्य ऊस उत्पादकांच्या हातात देण्यासाठी पिचड विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

यानिमित्ताने काल सोमवारी अकोले तालुक्यातील पिचड विरोधकांची बैठक रूंभोडीत पार पडली. यावेळी डॉ.अजित नवले, दशरथ सावंत, बी. जे. देशमुख, विनय सावंत, दादापाटील वाकचौरे, अरिफ तांबोळी, रमेश देशमुख, कॉ. कारभारी उगले, पाटीलबुवा सावंत, सुभाष येवले, रवी मालुंजकर, विनोद हांडे आदी उपस्थित होते.

बी.जे. देशमुख यांनी अगस्ती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कमी ऊस उपलब्ध असताना कारखान्यातील क्षमता वाढविण्याची गरज नव्हती, तसेच कार्यक्षेत्राबाहेरील उसामुळे तालुक्यातील ऊस उत्पादकांना तोटा होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यासाठी व्यवस्था परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

दशरथ सावंत म्हणाले, यापूर्वी विरोधकांच्या ताब्यात कारखाना दिला. मात्र, त्यावेळी ऊस कमी होता. तरीही काटकसरीने चालविण्याचा प्रयत्न सुरू असताना कामगार व संचालक मंडळ यांच्यात पिचडांनी संघर्ष उभा करून चांगल्या कारभारात जाणीवपूर्वक अडथळे आणले. मात्र, यावेळेस अगस्ती कारखान्यावर नेमके कर्ज किती? याची माहिती कारखान्याकडून माहितीच्या अधिकारात मागविली असून अगस्ती कारखान्याच्या क्षमतेएवढा ऊस अगस्तीच्या कार्यक्षेत्रात का उभा राहिला नाही? कारखान्याचा ऊस विकास विभाग काय करतो? असा सवाल त्यांनी केला.

डॉ. अजित नवले यांनी तालुक्यात परिवर्तनाची लाट असून अगस्तीसुद्धा सत्ता सम्राटांच्या हातातून सर्वसामान्यांच्या हातात घेऊ, त्यासाठी एकीची वज्रमूठ असणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले. विनोद हांडे यांच्यासह यावेळेस विविध कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद देशमुख, चंद्रभान आरोटे, दिलीप नवले, लक्ष्मण नवले, मनोहर मालुंजकर, विकास बंगाळ, नामदेव आरोटे, अरुण आरोटे, चंद्रकांत नेहे, पांडुरंग नवले आदींसह ऊस उत्पादक उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com