व्यक्ती द्वेषापोटी अगस्तीची निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही - पिचड

शेतकरी विकास मंडळाचा उत्पादक शेतकर्‍यांचा मेळावा
व्यक्ती द्वेषापोटी अगस्तीची निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही - पिचड

अकोले |प्रतिनिधी| Akole

अगस्ती कारखान्याची निवडणूक जाहीर होताच आपण बिनविरोधचा प्रस्ताव दिला होता. मात्र आमदार लहामटे, अशोक भांगरे, अजित नवले यांनी केवळ व्यक्ती द्वेषापोटी त्यास विरोध केला. कोपरगाव तालुक्यात आ. काळे व आ. कोल्हे हे राष्ट्रवादी व भाजप अशा विरुद्ध पक्षात आहेत. एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवितात. मात्र साखर कारखान्याच्या हितासाठी दोघांनी समजूतदारपणा दाखवत कारखाना निवडणुका बिनविरोध केल्या.

मग अगस्ती बिनविरोध का होऊ शकला नाही, असा सवाल करतानाच अगस्ती कारखान्यावर आपण कोणत्याही स्थितीत प्रशासक येऊ देणार नाही, अशी ग्वाही माजी मंत्री तथा कारखान्याचे संस्थापक मधुकरराव पिचड यांनी दिली. टोळीचे राजकारण करणार्‍यांना तसेच बिनविरोधला खोडा घालणार्‍यांना कायमचे घरी बसविण्यासाठी आपण शेतकरी विकास मंडळ उभे केले आहे. या मंडळाला विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.

अगस्ती सहकारी साखर कारखान्याची 17 जुलै रोजी होणारी निवडणूक शासनाचे आदेशाने स्थगित झाल्यानंतर अगस्तीच्या हंगामाचा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शेतकरी विकास मंडळाच्यावतीने चेअरमन मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली उत्पादक शेतकर्‍यांचा मेळावा महाराजा लॅान्स येथे संपन्न झाला. यावेळी पिचड बोलत होते तर ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत, निवृत्त प्रशासक बी.जे.देशमुख, मा. आ. वैभवराव पिचड, जि.प.सदस्य जालिंदर वाकचौरे, दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, बाजीराव दराडे, शिवाजीराजे धुमाळ, अकोले एज्युकेशन अध्यक्ष सुनील दातीर, नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, गिरजाजी जाधव, अप्पासाहेब आवारी, आनंदराव वाकचौरे, सुधाकरराव देशमुख, यशवंतराव आभाळे, अरुण शेळके, राहुल देशमुख, शंभू नेहे, सुरेश देठे, खंडू बाबा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पिचड म्हणाले की, कोपरगाव तालुक्यात आ.काळे व कोल्हे दोन्ही राष्ट्रवादी, भाजप अशा विरूद्ध पक्षात आहेत. एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवतात मात्र कारखाना चालावा म्हणून दोघांनी समजूतदारपणे कारखाने बिनविरोध केले मग आपला अगस्ती का होऊ शकला नाही. अगस्तीचा हंगाम सुरळीत पार पडेल आपण सर्वतोपरी मदत करू सरकार पातळीवरील अडचणीही दूर करू, असे आश्वासन पिचड यांनी दिले.

माजी आ. वैभवराव पिचड म्हणाले, समोरच्या मंडळातील लोकांना निवडणूक होण्यापूर्वीच निवडून येऊन चेअरमन झाल्यासारखे स्वप्न पडत असून त्या आविर्भावात ते काल बरळत होते. आज तालुक्यातील गोरगरिबांच्या ठेवी पतसंस्थेत आहेत. या पतसंस्थेच्या कारभारापाई काही शेतकर्‍यांनी जमिनी विकल्या तर काहींना आत्महत्या करायची वेळ आली या पतसंस्था गोरगरिबांना लुटण्याचे काम करत असेल तर चौकशी केली तर काय बिघडेल.

बी. जे. देशमुख म्हणाले, कारखाना निवडणूक स्थगित झाली असली तरी पूर्वीचे संचालक मंडळ अजून बरखास्त नाही त्यामुळे ते चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक मंडळानेच कारभार पहावा लागेल. तुमच्याकडे बहुमत आहे तर मग चालवाना उगच कशाला दोरीचा साप करून भुई थोपटायचे काम करत आहात .मोठ्या लोकांची नावे घेतल्याने पैसे मिळत नाही अशी टीका करून लगेच प्रशासक येणार नाही. त्यासाठी अपील, सुनावणी आदी गोष्टी होतील यातच दोन ते तीन महिन्याचा कार्यकाल निघून जाईल तेव्हा कारखाना हंगाम सुरु करण्यासाठी तयारी करा

ज्येष्ठ नेते दशरथ सावंत जोरदार टीकात्मक भाषणात म्हणाले, या टोळीला पुन्हा कारखान्यात येऊ नये म्हणून आम्ही शेतकरी विकास मंडळाला पाठिंबा दिला आहे. आज हे म्हणतात आमचे मागे अजित पवार, शरद पवार आहे. कोणी मागे असून होत नाही अजित पवार उपमुख्यमंत्री, शरद पवार मागे असताना त्यांचेच गृहमंत्री देशमुख व नवाब मलिक जेलमध्ये आहेत काही करता आले का? सरकार कारखान्यासाठी फक्त थकहमी बँकेला देऊ शकते व तरच बँक कारखान्याला कर्ज देईल. या टोळीला व टग्यांना काहीच अक्कल नाही.कोर्टात जाणे हिताचे आहे का? दुसरे संचालक येई पर्यंत जबाबदारीतून पळता येणार नाही. तसेच गायकरानी बँकेत केलेले पाप कोर्टापुढे आणून त्याना एक दिवस जेलमध्ये घालणार, असा दावा केला आहे. सभेचे सूत्रसंचालन भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले तर आभार सहदेव चौधरी यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com