आगरकर मळ्यातील कंटेन्मेंट झोनला नागरिकांचा विरोध

महापालिकेच्या अधिकार्‍यांकडे तक्रारी
आगरकर मळ्यातील कंटेन्मेंट झोनला नागरिकांचा विरोध
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आगरकर मळा भागातील कंटेन्मेंट झोनच्या विरोधात नागरिक रस्त्यावर आले आहेत.

रुग्ण बरे होऊन देखील हा भाग सील केल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी महापालिका अधिकार्‍यांकडे केल्या आहेत.

महापालिकेने या भागात कंटेन्मेंट झोनचा आदेश दिला. रात्रीतून कर्मचार्‍यांनी हा भाग सील केला. आदेशात दाखविलेल्या नकाशापेक्षा जास्त भाग सील केल्याचा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्याने जागरुक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्या पुढाकारातून नागरिकांनी महापालिका अधिकार्‍यांकडे आपली कैफियत मांडली.

नागरिकांचे म्हणणे आहे की, या भागात अगदी विस्कळीत स्वरूपामध्ये दहा ते पंधरा रुग्ण आढळून आले. त्यापैकी निम्मे आता उपचार घेऊन घरी परतले आहेत. त्यानंतर प्रशासनाने दोन हजार लोकवस्ती असलेला भाग सील केला. तो सील करताना आतील लोकांच्या आणि परिसरातील अन्य नागरिकांचाही विचार केला नाही. या भागात काही शेतकरीही आहेत. त्यांची जनावरेही आत अडकली आहेत. त्यांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अडकून पडले आहेत.

त्यांना कामावर जायचे असेल तर बाहेरच राहण्याची सोय करण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भागाचे पुन्हा सर्वेक्षण करून खरोखर किती भाग सील करण्याची अवश्यकता आहे, याचा विचार करून बाकीचा मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com