File Photo
File Photo
सार्वमत

प्रवरासंगमच्या पुलावर आज मराठा मोर्चाचे आंदोलन

स्व. काकासाहेब शिंदे यांचा स्मृतीदिन; नगर-औरंगाबाद मार्गावरील वाहतूक वळविणार

Nilesh Jadhav

नेवासा|शहर प्रतिनिधी | Newasa

मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणारा तरुण काकासाहेब शिंदे यांच्या दुसर्‍या स्मृतीदिनानिमित्त आज मराठा मोर्चाचे समन्वयकांनी प्रवरासंगम येथील गोदावरी नदी पुलावर ‘बलीदान ते आत्मबलिदान’ आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

खबरदारी म्हणून नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक दुपारी 3 वाजेपर्यंत वळविण्याचा निर्णय जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतला असून या आंदोलनाशी आमचा संबंध नसल्याचे काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले आहे.

मराठा आरक्षण आंदोलनामध्ये काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली या घटनेला गुरुवारी दोन वर्षे पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने उद्या मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी प्रवरासंगम येथील गोदावरी नदी पुलावर बलीदान ते आत्मबलिदान आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

आंदोलनात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होण्याची शक्यता असून त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व कायदा सुव्यवस्थेच्यादृष्टीने खबरदारी म्हणून औरंगाबाद -पुणे या महामार्गावरील वाहतूक पैठण, शेवगावमार्गे वळवण्याचा निर्णय अहमदनगरचे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी घेतला आहे.

गुरुवारी पहाटे 5 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. सदरील आदेश शासकीय वाहने रुग्णवाहिका व आपत्कालीन वाहने यांना लागू राहणार नाही.

वळवलेली वाहतूक

नगरकडून औरंगाबादकडे जाणार्‍या वाहनांसाठी-

अहमदनगर-नेवासाफाटा-कुकाणा-शेवगाव-पैठण-बिडकीन-मार्गे औरंगाबाद.

तसेच अहमदनगर-घोडेगाव - कुकाणा - शेवगाव -पैठण -बिडकीन- मार्गे औरंगाबाद

औरंगाबादकडून अहमदनगरकडे जाणार्‍या वाहनांसाठी -औरंगाबाद- बिडकीन- पैठण- शेवगाव- मिरी- पांढरीपूलमार्गे- अहमदनगर

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलनाशी माझा व कुटुंबाचा काहीही संबंध नाही. 29 जून रोजी कायगाव येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी मला कुठलीही माहिती न देता स्व. काकासाहेब दत्तात्रय शिंदे यांच्या पुतळ्याला केवळ अभिवादन करण्यासाठी बोलावले होते. त्यांनी मीडियाला मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या 23 जुलैच्या आंदोलनाबाबत माहिती दिली. वास्तविक पाहता मला त्यांनी आंदोलनाच्या इशार्‍यासाठी हे सर्व केले याची काहीही कल्पना नव्हती. त्यामुळे 23 जुलैच्या आंदोलनाशी माझा व माझ्या कुटुंबियांचा काहीही संबंध नाही.

-अविनाश शिंदे स्व. काकासाहेब शिंदे यांचे बंधू

Deshdoot
www.deshdoot.com