महावितरणविरोधात मनसेचा नाऊर पुलावर रास्ता रोको

सक्तीची वीजबील वसुली रद्द करण्याची मागणी
महावितरणविरोधात मनसेचा नाऊर पुलावर रास्ता रोको

नाऊर |वार्ताहर| Naur

श्रीरामपूर व वैजापूर तालुक्याच्या मध्यवर्ती हद्दीवर नाऊर येथील गोदावरीच्या पुलावर महावितरणा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच्यावतीने वैजापूर-श्रीरामपूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. शेतकर्‍यांची वीज तोडणी, सक्तीची वीजबील वसुली, आदींसह महावितरणाच्या विविध शेतकरी विरोधी धोरणांबाबत मनसेकडून अनेकवेळा निवेदन देऊनही याची दखल महावितरण घेत नसल्याने मनसेने बुधवारी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी करत जवळपास दोन तास रस्ता अडवून धरला होता.

यावेळी वीरगाव पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवून घटनास्थळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राहुल बडवे, सहाय्यक अभियंता अनिल डुकरे यांनी यावेळी भेट देऊन मनसेच्या मागण्यांबाबत वरिष्ठ पातळीवर कळवून लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. वीरगाव पोलीस ठाण्याचे विजय नरवडे व नवनाथ कदम आदीच्या मध्यस्थीनंतर रास्तारोको आंदोलन थांबविण्यात येऊन मनसेने हे आंदोलन मागे घेतले.

यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घंगाळे, तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड, जिल्हा सचिव गणेश भारती, महिला जिल्हा उपाध्यक्ष जयश्री बागुल, मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष मनोज पुंडेकर, नंदू हिरडे यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करत या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी नाऊरचे माजी सरपंच प्रतापराव देसाई, वसंतराव शिंदे, शिवाजी शिंदे, योगेश तुपे, सागर फुलारे, अमोल काळे, सुनील सुराशे, अमोल गंगुले, संदीप साळुंके, सिताराम पानकर, गणेश बहाळसकर, अमोल वाणी, गणेश कदम, सुधीर फुकटे, योगेश थोरे व मनसे सैनिक उपस्थित होते.

यावेळी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश गोरे, हेड कॉन्स्टेबल गाडेकर आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com