पुन्हा तीन गायी दगावल्या

केलवडमध्ये दगावणाऱ्या गायींची संख्या झाली १४
पुन्हा तीन गायी दगावल्या
File Photo

अस्तगाव (वार्ताहर)

राहाता तालुक्यातील केलवड परिसरात लाळ्या खुरकत तसेच काही अंशी घटसर्प सदृश्य लागण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ११ गायी दगावल्या या सार्वमतच्या वृत्तानंतर पशुसंवर्धन विभागाचे पथक केलवडला दाखल झाले.

काल दिवसभर या पथकाने जनावरांच्या तपासण्या करत रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. कालही पथक तपासण्या करत असताने तीन गायी दगावल्या. आता मृत पावल्यांची गायींची सख्या १४ वर पोहचली आहे.

काल सकाळी पशुसंवर्धनच्या सहायक आयुक्त श्रीमती डॉ. ओहोळ आपल्या टिमसह केलवडमध्ये दाखल झाल्या. त्यांनी अनेक ठिकाणी गायींची पाहाणी करत रक्ताचे नमुने घेण्याच्या सुचना संबंधीतांना दिल्या. काल नाना गवराम राऊत यांच्या कालवडीसह अण्णासाहेब घोरपडे व लक्ष्मण घोरपडे यां दोघांच्या दोन गायी दगावल्या अशा एकूण तीन गायी काल दगावल्या. त्यामुळे केलवड येथे दगावणाऱ्या गायींची संख्या आता १४ वर पोहचली आहे.

केलवडच्या या प्रकाराने पशुवैद्यकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. काल आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावतीने जनसेवा कार्यालयातील स्विय सहायक प्रमोद राहाणे यांनी सहायक आयुक्त श्रीमती डॉ. ओहोळ यांच्याशी संपर्क करुन शेतकरी वर्ग, व पशुपालकांना सहकार्य करण्याच्या सुचना॒ दिल्या. राहाता तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी पशुवैद्यकीय केंद्र आहेत. तेथील यंत्रणा केलवडला इतर टिमच्या दिमतीला पाठविली आहे. या शिवाय लसीकरणही सुरु करण्यात आले आहे. राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी त्यांच्या पशुसंवर्धन विभागाला योग्य त्या सुचना दिल्या आहेत. राहाता पंचायत समितीचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर शेळके, केलवड चे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. पवार यांनी प्रत्येक गोठ्यास भेट देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना व वरिष्ठांना काही अंशी शेतकऱ्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. शेतकरी अंजाबापू जटाड यांनी गायींना आजार झपाट्याने वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करुन अनेक जनावरांना या आजारापासून धोका असल्याचे सांगितले. केलवड येथील ज्या शेतकऱ्यांच्या गायी दगावल्या आहेत. त्यांना शासनाने मदत द्यावी, अशी मागणी बाळासाहेब सुधाकर गमे यांनी केली आहे.

केलवड येथील पशुवैद्यकीय क्षेत्रात खाजगी प्रॅक्टीस करणारे डॉक्टर डॉ. महेश उर्फ विकास गमे, डॉ. राहुल घोरपडे, डॉ. शरद गमे, डॉ. शेळके, डॉ. चौधरी, या डॉक्टरांनी शेतकऱ्यांना चांगला आधार दिला आहे. ते पशुधन वाचविण्यासाठी उपचाराची पराकाष्टा करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.

पथका समोरच कालवडीने तोडला दम!

काल श्रीमती ओहोळ भेटी देत असतानाच नाना गवराम राऊत यांची एक कालवड त्यांच्या समोरच दगावली. या कालवडीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. शैलेश बन यांनी तात्काळ शवविच्छेदन केले.

आज डॉ. तुबारे भेट देणार

केलवडच्या गायी दगावण्याच्या पार्श्वभूमिवर जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. सुनिल तुंबारे हे केलवड येथे भेट देणार आहेत. त्यांच्या समवेत जिल्हा पशुवसंवर्धन अधिकारी डॉ. हरिश्चंद्रे हे ही येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com