
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरातील नागरीकांकडून कर वसूल केला नाही, महानगरपालिकेचे नुकसान केले म्हणून कर वसुली अधिकारी व कर्मचार्यांवर मनपा आयुक्तांकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईपेक्षा मनपातील इतर विभागात असलेल्या भ्रष्ट, हलगर्जीपणा व गैरकारभार करणार्यांवर, संगनमताने महापालिका लुटणार्यांवर कठोर कारवाई व तातडीने होण्यास हवी, ते करण्याचे धाडस दाखवावे, असे आवाहन अॅड. श्याम आसावा यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना केले आहे.
आयुक्त डॉ. जावळे यांना पाठविलेल्या मेलमध्ये अॅड. आसावा यांनी म्हटले आहे, नुकतेच थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे सुतोवाच केले. कर वसुली झाली तर महापालिकेस नागरिकांना सोयी, सुविधा पुरविणे सुलभ होते व सुलभ सुविधा मिळाल्या तर नागरिकांनी कर भरणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र, शहरात बोटावर मोजता येतील असे अपवाद सोडले तर खड्डेमय रस्ते, अतिक्रमण व त्यामुळे मोक्याच्या जागा बोक्यांनी गिळंकृत करणे, शुध्द व नियमीत पाणी, रात्रीचा अंधार, आरोग्य सुविधा, उद्यान, सामूहिक शौचालय, ऐतिहासिक स्थळांची दुरवस्था अशी प्रश्नांची जंत्री आहे.
महापालिकेचा सर्व विभागांचे वरिष्ठ तर आंधळे व बहिरे झालेत. स्वत: होऊन त्यांना गैरकारभार दिसतच नसल्याने इतर कोणी तक्रार केली, तरच त्याची दखल घेतली जाणे दुर्दैवी आहे. महापालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभारमुळे कोट्यवधी रुपये पर्यायाने नागरिकांनी शासनास विविध करांच्या माध्यमातून जमा होणारा पैसा कर्तव्यात कसूर करणार्या अधिकारी व कर्मचार्यांच्या पगारावर व त्यांना पोसण्यासाठी खर्च होत आहे. महापालिकेतील लुटारूंना मोकाट सोडणार असाल तर कर वसुली विभागातील संबंधितांवर कारवाई करण्याची भीती दाखवून कर वसुली हा या लुटारूंना लूट करण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठीचा खटाटोप ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.