आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा बॅकफुटवर

वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन
प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

देशाच्या व राज्याच्याही राजकारणात बदल हा अटळ आहे. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लाट तयार झाली आहे. तीन राज्यांच्या निवडणुका अगोदर लोकसभेची निवडणूक होणार असून त्यात भाजपा बॅक फुटवर येणार असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

काल वैजापूरहुन श्रीरामपूर येथे आले असता येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील वादाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, राजकारणात अजित पवार यांच्याकडे शरद पवार यांच्या तुलनेत पाच टक्केही राजकीय प्रगल्भता नाही. आम्ही उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबरच होतो आणि यापुढेही राहणार आहोत. भविष्यात तेलंगणातील बीआरएस व शिवसेना एकत्र येणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. देशात भाजपा विरोधात तयार झालेल्या इंडिया आघाडीकडे कोणत्याही प्रकारचा आरोप नसलेला प्रवक्ता म्हणून नवीन चेहरा आला पाहिजे असे ते म्हणाले. नाबार्डमध्ये 48 हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला असून त्याची चौकशी पुर्ण झाली आहे. यानंतर येणार्‍या कोणत्याही सरकारला त्यांच्याविरोधात कारवाई करावी लागणार आहे.

भारतीय जनता पक्षाचा ग्रामीण भागाचा खरा बेस हा शिवसेना आहे. शिवसेनेमुळेच त्यांना मतदारावर प्रभाव टाकणे सोपे होते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच सेना-बीजेपी विजयी होत असल्याचा दावा त्यांनी केला. बाळासाहेबांची शिवसेना व नामदेव धसाळ यांचे दलित पँथर दोघांचा ढाचा एकच होता तो म्हणजे सामूहिक जमाविकरण व प्रभाव आणि सामान्य माणसावरती प्रचंड पगडा परंतू संघटना बांधणे व खालपर्यंत उभे करणे दोघांनाही जमले नाही. नंतरच्या चळवळी उभ्या राहिल्या त्या त्याच व्यक्ती चित्रणामुळे उभ्या राहिल्या. भाजपाचे बांधलेले नेटवर्क सक्षम असल्यामुळे त्यांना हा सर्व बदल करता आला. परंतु नजीकच्या काळामध्ये जेव्हा निवडणुका होतील मग त्या विधानसभा असो किंवा लोकसभा यामध्ये सर्वात जास्त मार खाणारा पक्ष हा भाजपच असेल त्यांच टेबल नेटवर्क जरी असले तरी प्रभाव पाडणारे नेतृत्व त्यांच्याकडे नाही, असेही ते म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com