शेतकरीपुत्रांनी शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी एकत्र यावे- अ‍ॅड. काळे

शेतकरीपुत्रांनी शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी एकत्र यावे- अ‍ॅड. काळे

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

राजकीय स्वार्थासाठी सर्व राजकीय पक्ष, सत्ताधारी व विरोधक एकत्र आल्याचे महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळाले. परंतु शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर अद्यापपर्यंत कोणालाही उत्तर शोधता आले नाही. यासाठी शेतकरी पुत्रांनी शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी एकत्र यावे, असे आवाहन अ‍ॅड. अजित काळे यांनी केले.

तालुक्यातील उस्थळ दुमाला येथे प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी जनजागृती सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सरपंच बाबासाहेब कोतकर यांनी प्रहार व शेतकरी संघटनेची एकत्रित शेतकरी जनजागृती सभा आयोजित केली होती.

अ‍ॅड. काळे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये सर्वच राजकीय पक्ष, विरोधक त्याचप्रमाणे सत्ताधारी अशा भूमिकेमध्ये एकाचवेळी महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळाले. परंतु शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर अद्यापपर्यंत कोणालाही उत्तर शोधता आले नाही. यासाठी शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लढणार्‍या सर्व संघटना व पक्षांनी एकत्र येऊन आपल्या स्वतःच्या जीवनासाठी संघर्ष करावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे म्हणाले, ज्यावेळी शेतकर्‍यावर अन्याय होतो, त्यावेळी प्रहार धावून गेल्याशिवाय राहत नाही. परंतु जनतेने देखील आता सजग व्हावे. लोकशाहीच्या रणसंग्रामात देखील कामाच्या माणसांना साथ द्यायला हवी.

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, प्रहारचे बाळासाहेब खर्जुले, अ‍ॅड. पांडुरंग औताडे, शेतकरी संघटनेचे अंबादास कोरडे, त्र्यंबक भदगले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. अशोकराव ढगे, ज्ञानेश्वर सांगळे, प्रशांत कराळे, प्रहार तालुका प्रमुख जालिंदर आरगडे, अनिल विधाटे, विकास कोतकर, बाबासाहेब कोतकर, पांडुरंग नवले आदी उपस्थित होते. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व केंद्रीय जल अकादमी वॉटर हिरो पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजीराव घाडगे यांचा सत्कार करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com