
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्यस्तरीय शिवसेनेत फूट पडल्यावर शिवसंवाद यात्रेचा पहिला टप्पा सुरू केलेले माजी पर्यावरण मंत्री व युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उद्या शनिवारी (दि. 23) नगर जिल्ह्यातील नेवासा फाटा व शिर्डी येथे येणार आहेत. नेवासा फाटा येथे दुपारी 2 वाजता व शिर्डीत सायंकाळी 5 वाजता त्यांचा मेळावा होणार आहे.
या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे शिर्डीचे खा. सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला असल्याने आदित्य ठाकरे यांचे शिर्डीत कोण स्वागत करणार, याची उत्सुकता आहे. दरम्यान, नेवासा फाटा माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व त्यांचे समर्थक त्यांच्या स्वागताला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व 10 अपक्ष आमदारांसमवेत भाजपसमवेत जाऊन राज्यात सरकार स्थापन केले आहे. भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेची व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी तसेच पक्षाच्या संघटनात्मक नियोजनासाठी आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा गुरुवारी भिवंडी व नाशिकला होती. आज शुक्रवारी (22 जुलै) मनमाड व औरंगाबादला असणार आहे व उद्या शनिवारी (23 जुलै) सकाळी पैठण, दुपारी नेवासा फाटा व सायंकाळी शिर्डीत येणार आहे.
जिल्हा शिवसेनेत शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे व नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख असे दोन मुख्य नेते सेनेत आहेत. यापैकी आ. गडाखांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत राहणार असल्याचे जाहीर केले आहे तर खा. लोखंडेंनी मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेहे उद्या शनिवारी जिल्ह्यात येतील तेव्हा त्यांच्यासमवेत कोण-कोण दिसणार, याची उत्सुकता आहे. उद्या दुपारी नेवाशात होणार्या मेळाव्यास आ. गडाख व त्यांचे समर्थक उपस्थित असणे अपेक्षित आहे. मात्र, सायंकाळी शिर्डीत खा. लोखंडे यांची अनुपस्थिती असणार आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाभरातील पक्षाचे जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना अशा विविध विभागांचे किती पदाधिकारी वकोणत्या कार्यक्रमास उपस्थित राहतील, याचे कुतूहल वाढले आहे.
नगर मधूनही निम्मी उपस्थिती
नगर महापालिकेतील शिवसेनेच्या 23 नगरसेवकांपैकी पाच नगरसेवकांनी स्पष्टपणे मुख्यमंत्री शिंदे यांची बाजू घेतली आहे व काही नगरसेवकांनी ठाकरेंना समर्थन दिले आहे. याशिवाय अन्य काही नगरसेवकांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. त्यामुळे ठाकरेंच्या नेवासे व शिर्डी दौर्यात नगर शहराच्या शिवसेनेतील किती चेहरे दिसतात, याचीही वेगळीच उत्सुकता जिल्हाभरात आहे.