करोना नियमांचे पालन करत ज्ञानेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले

करोना नियमांचे पालन करत ज्ञानेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

पुंडलिक वरदे..हरि विठ्ठल..श्री ज्ञानदेव ..तुकारामचा नामजप करत श्रीक्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर सोमवारी मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांच्याहस्ते उघडण्यात आले.

करोनाच्या महामारीमुळे गेल्या सात-आठ महिन्यांपासून संत ज्ञानेश्वर माउलींचे मंदिर बंद होते. राज्य शासनाने मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वारकरी भक्त, संत-महंत व कीर्तनकार यांच्यामध्ये उत्साह दिसून आला. ज्ञानेश्वर मंदिर उघडण्याच्यावेळी महाराष्ट्र वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष भैय्या कावरे, भानुदास गटकळ, संदीप आढाव, गोरख भराट उपस्थित होते.

शिवाजी महाराज देशमुख यांच्याहस्ते पैस खांबास अभिषेक घालण्यात आला. मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून परिसरही स्वच्छ करण्यात आला. मंदिरात भाविकांनी प्रवेश करताच तब्बल आठ महिन्यांनंतर घंटांचा निनाद व हरिनामाचा जप ऐकावयास मिळाल्याने येथील वातावरण मंगलमय झाले होते.

शिवाजी महाराज देशमुख म्हणाले की करोनाच्या महामारीमुळे आठ महिन्यांनंतर मंदिरे उघडण्यास राज्य शासनाने परवानगी दिली या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मंदिरे उघडल्याने करोनाशी सामना करताना भक्तांना भगवंताच्या दर्शनाने आत्मिक बळ व सामर्थ्य प्राप्त होईल. भगवंताला आपल्या भक्तांची काळजी असल्याने करोनाचे संकटही लवकर जावो म्हणून आपण प्रार्थना करणार आहोत.

माऊलींचे व पैस खांबाचे दर्शन घेताना भाविकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. मास्क लावूनच दर्शन घ्यावे. अन्यथा ‘नो मास्क नो दर्शन’ ही नियमावली केली जाईल असे सांगून करोनाचे संकट अजूनही गेलेले नसल्याने सर्वांनी नियमांचे पालन करत सामाजिक अंतर ठेवत पालन करावे,असे आवाहन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com