आढळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून रोगराईला निमंत्रण

दुर्गंधीयुक्त आणि अशुद्ध पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
आढळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून रोगराईला निमंत्रण

वीरगाव |वार्ताहर| Virgav

करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आढळा परिसरातील वीरगाव, हिवरगाव, डोंगरगाव, पिंपळगाव निपाणी आणि गणोरे येथील नागरिकांचे आरोग्य दुषित पाणी पुरवठ्यामुळे धोक्यात आले आहे.

अकोले तालुक्यातील देवठाणच्या आढळा धरणातून वरील पाचही गावांना प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. ट्रिपल फिल्टरेशन वॉटरच्या नावाखाली दरवर्षी पाणीपट्टी मोठ्या प्रमाणावर वसूल केली जाते.परंतु शुध्द पाण्याच्या नावाखाली नागरिकांचे घशात दुर्गंधीयुक्त दुषित पाणीच ओतले जाते.सध्या नागरिकांचे घरात जाणारे पाण्यात अळ्या येत असून पाण्याला येत असलेल्या दुर्गंधीमुळे पाचही गावचे नागरिकांना किरकोळ स्वरुपात पोटदुखी, अतिसार आणि घशाचे आजार झालेले आहेत. करोनाचे भय मानगुटीवर पक्के बसल्याने अशुध्द पाण्याने होणारे संभाव्य आजार चिंताजनक ठरतील.

शासनाचे आरोग्य खाते वेळोवेळी पाण्याची तपासणी करीत असल्याची माहिती मिळाली.परंतु तपासणी अहवालात किरकोळसुध्दा त्रुटी नसल्याने नागरिकांना अतिशुध्द पाणी दिले जात असल्याचा कागदोपत्री अहवाल आहे. त्यामुळे पाणी तपासणी पाणीपुरवठा योजनेतील पाण्याचीच होते की विकतच्या बिसलेरीची तपासणी करुन अहवाल तयार होतो अशी शंका आहे. लाखो रुपयांची पाणीपट्टी या योजनेकडे जमा होते.शासनाचीही आर्थिक मदत असतेच. हा सारा पैसा जातो कोठे? हा प्रश्न तयार झाला आहे.पाणीपुरवठा योजनेतील पाणी फारच शुध्द मिळते अशी पध्दतशीर जाहीरात जरी होत असली तरी तो केवळ बनाव आहे हे धोक्यात आलेल्या नागरिकांच्या आरोग्यावरुन ध्यानात येते.

पावसाळ्यापुर्वी दरवर्षी धरणाचा पाणीसाठा मृतसाठ्याकडे जाताना पाणी खराब होते. मात्र तशी परिस्थिती यावर्षी नाही. मिळणारे पाणी शुध्द स्वरुपात न मिळाल्यास ऐन पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याचा संभव आहे.करोनाची दुसरी लाट ओसरलेली असली तरी तज्ज्ञांनी दिलेले तिसर्‍या लाटेचे संकेत खरे ठरले तर आढळा परिसरातील रुग्णवाढीसाठी अशुध्द पाणीपुरवठा निमित्त झाल्याशिवाय राहणार नाही.

पाणी असून पाण्याचे दुर्भिक्ष

वीरगाव, हिवरगाव, डोंगरगाव, गणोरे, पिंपळगाव या गावातील नागरिक पाणीपट्टी दरवर्षी कटाक्षाने जमा करतात. आढळा धरणात पाण्याची परिस्थिती चांगली असली तरी पाणीपुरवठा दिवसाआड होतो. पाणीपट्टी 365 दिवसांची भरायची आणि पाणी मिळणार मात्र 180 दिवस.त्यातही कधीकधी तीन दिवसांनी पाणी मिळते. म्हणजे वर्षाकाठी नागरिकांना 150 दिवसच पाणी मिळते. आढळा धरणात भरपूर पाणी असले तरी नागरिकांसाठी मात्र पाण्याचे अधुनमधून दुर्भिक्ष निर्माण होतेच. पाणीपुरवठा योजना सुरळीत चालावी म्हणून नागरिक हक्काच्या पाण्याचा त्याग करीत असतानाच त्यांना दिवसाआड मिळणारे पाणीही शुध्द मिळत नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com