100 दिवसांत आढळा धरणात केवळ 463 दलघफू पाणी आवक

पाणलोटासह लाभक्षेत्रावर दुष्काळाचे सावट
100 दिवसांत आढळा धरणात केवळ 463 दलघफू पाणी आवक

वीरगाव |वार्ताहर| Virgav

1060 दलघफू पाणीसाठा क्षमतेच्या देवठाण येथील आढळा मध्यम प्रकल्पाचा सध्या पाणीसाठा 1000 दलघफू झाला.तांत्रिकदृष्ट्या धरण भरल्याची स्थिती वाटत असली तरी आढळेच्या पाणलोट आणि लाभक्षेत्रात तीव्र दुष्काळाचे सावट आहे.

मागील वर्षी धुवाँधार पावसाळ्यात 15 जुलै 2022 रोजी हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला होता. आताचा पाणीसाठा 1000 दलघफू दिसत असला तरी यात पुर्वीचा पाणीसाठा 537 दलघफू शिल्लक होता. म्हणजे भर पावसाळ्यात 100 दिवसांत अवघी 463 दलघफू पाण्याची आवक झाली. यावरुन आढळेच्या पाणलोटातील अत्यल्प पावसाचा अंदाज येतो. आढळेवरील सांगवी (71.23 दलघफू) आणि पाडोशी (110 दलघफू) हे दोन्ही लघुप्रकल्प भरले एवढेच काय ते समाधान वाटण्याची सध्याची स्थिती आहे.

पावसाळ्याच्या अंतिम चरणातही नदीपात्र कोरडेठाकच आहे. धरणात होणारी पाणी आवक जवळपास शुन्य आहे. पाणलोट आणि लाभक्षेत्रातील ओढ्यानाल्यांचीही पाण्याअभावी अवकळाच आहे. अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील 15 गावातील 3914 हेक्टर सिंचनक्षम क्षेत्रासाठी ही धोक्याची घंटा आहे. नदीनाल्यातून पाणीच वाहिले नसल्याने नदीपात्र आणि ओढेनाल्यांच्या कडेलादेखील गवताचे ठिपूस दिसत नसल्याने दुष्काळाचा अंदाज येईल.

चोवीस तासांत केवळ दोन ते तीन दलघफू पाण्याची आवक सुरु असल्याने धरण पूर्ण क्षमतेने कधी भरणार? याचीच चिंता लाभक्षेत्राला भेडसावत आहे.आगामी नक्षत्रांत तरी पाऊस कोसळेल आणि धरण भरुन नदीपात्र वाहते होईल ही आशा आहे. सलग तीन वर्ष भरभरुन पावसाचे दान मिळाले. यंदा मात्र आढळेचे सारेच लाभक्षेत्राला दुष्काळाचा सामना करावा लागण्याची भीती सतावत आहे.

खरिपाला पाणी...रब्बी धोक्यात

पावसाचा अद्यापही अंदाज नसल्याने खरीप आणि उभ्या पिकांसाठी पाणीमागणी होत असल्याची माहिती जलसंपदाचे सहाय्यक अभियंता रजनीकांत कवडे यांनी दिली. आतापर्यंत उजव्या कालव्यातंर्गत 250 हेक्टर क्षेत्राची पाणी मागणी झाली. डाव्या कालव्यावर अजून पाणी मागणी नसली तरी तिथेही पाणी मागणी होणारच. 5 सप्टेंबर रोजी आवर्तन सुटण्याची शक्यता आहे. खरीप आणि उभ्या पिकांसाठी आता पाणी वापर होईल. भविष्यात पावसाने दगा दिला तर आता खरीपासाठी पाणी वापर झाल्यास आढळेचा रब्बी हंगाम मात्र पुर्ण धोक्यात येईल.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com