पावसाळ्याच्या अखेरीस मिटली आढळाची चिंता

पावसाळ्याच्या अखेरीस मिटली आढळाची चिंता

वीरगाव |वार्ताहर| Virgav

हस्ताच्या उत्तरार्धात एखादा मोठा गडगडाटी पाऊस आढळा धरणाला काही तासात ओतप्रोत भरेल. पण नाहीच कोसळला तरीदेखील दोन-तीन दिवसांत हे धरण पुर्णत्वाने नक्कीच भरेल.अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्याच्या सिंचनाची काळजी करणारे देवठाणच्या आढळा धरणातील पाणी सांडव्यावरून झेपावण्यास आता सज्ज झाले आहे.

वरील तीनही तालुक्यांच्या 16 गावांना एकच चिंता होती. ती म्हणजे आढळा कधी भरेल! महाराष्ट्रातील सर्वदूरची धरणे भरली असता केवळ 1060 दलघफू क्षमतेच्या आढळा मध्यम प्रकल्पाने मात्र लाभधारकांची चिंता वाढवली होती. पावसाळ्याची सुरुवात होताना 1 जून रोजी धरणात 508 दलघफू पाणीसाठा होता.आज हा साठा 1028 दलघफू इतका आहे. म्हणजे सबंध पावसाळ्यात धरणात केवळ 520 दलघफू नवे पाणी आले.धरणक्षेत्रात पावसाळ्याची सुरुवात ते परतीचा पाऊस या कालावधीत 345 मीमी पाऊस कोसळला. याचा अर्थ 177.11 चौ किमी. एवढे अतिविशाल पाणल़ोट क्षेत्रात कोसळणारा पाऊस वर्षागणिक घसरणीला लागला आहे. फक्त सन 2019 आणि 2020 मध्ये पावसाचे प्रमाण बरे होते. यावर्षी धरण धरण अनुक्रमे 4 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट रोजी भरले होते.

आढळा धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यावर अवलंबून असणार्‍या 3914 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाची चिंता यावर्षी परतीच्या पावसात का होईना मिटली. परंतु धरण भरल्यानंतरही नदी किंवा कालवे काही दिवस वाहिले नाही तर रब्बी हंगामानंतरचा कालखंड मात्र आढळेला पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा जाईल ही भीती आहेच.

सध्या धरणात 1028 दलघफू इतका पाणीसाठा असल्याने धरण भरल्याची खात्रीच लाभधारकांना आली आहे. हस्त नक्षत्राच्या उत्तरार्धात मेघगर्जना आणि वीजांचा कडकडाट सुरु झाल्याने धरण तर भरेलच परंतु नदी आणि कालवेही दुथडी भरून वाहतील ही आशा आहे.

Related Stories

No stories found.