आढळा धरणात 600 क्युसेकने आवक सुरू
सार्वमत

आढळा धरणात 600 क्युसेकने आवक सुरू

आढळेवरील पाडोशी व सांगवी लघुप्रकल्प ओव्हरफ्लो

Arvind Arkhade

वीरगाव |वार्ताहर| Virgav

पाणलोट क्षेत्रात सलग दोन दिवस चाललेल्या संततधारेमुळे अकोले तालुक्याच्या आढळा नदीवरील पाडोशी आणि सांगवी लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले. दोन्ही लघुप्रकल्प भरल्याने आता देवठाणच्या आढळा मध्यम प्रकल्पातही पाण्याची समाधानकारक आवक सुरू आहे.

आढळा नदीवरील 146 दलघफू पाणीसाठा क्षमतेचा पाडोशी लघुप्रकल्प बुधवारी 12 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता पूर्ण क्षमतेने भरला. त्यानंतर सांगवी येथील 71.36 दलघफू पाणीसाठा क्षमतेचा प्रकल्पही गुरुवारी 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वा. पूर्णपणे भरल्याचे जलसंपदाचे शाखा अभियंता आर. एच. बोरसे यांनी सांगितले.

आढळा नदीतून 600 क्युसेकने 1060 दलघफू पाणीसाठा क्षमतेच्या आढळा धरणाकडे पाण्याची जोरदार आवक सुरू झालेली आहे. आढळा धरणाचा पाणीसाठाही शुक्रवारी दुपारपर्यंत 575 दलघफू झाल्याची माहिती जलसंपदा खात्याच्या सूत्रांकडून मिळाली.

पाडोशी आणि सांगवी लघुप्रकल्पांतर्गत पाडोशी, एकदरावाडी, चंदगीरवाडी, पिंपळदरावाडी, सांगवी, केळी, टाहाकारी, समशेरपूर, सावरगाव पाट या गावांच्या लाभक्षेत्राचे सिंचन होते. पाडोशी लघुप्रकल्पाचे पाणी 709 हेक्टरसाठी उपलब्ध असले तरी सध्या केवळ 180 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. सांगवी लघुप्रकल्पाचे पाण्यातूनही 356 हेक्टर क्षेत्राचे सिंचन होत असल्याची माहिती मिळाली.

आढळेच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांच्या संततधारेने पाडोशी, सांगवीनंतर देवठाणचे आढळा धरणही लवकर भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com