वेळप्रसंगी ‘आढळे’चा संघर्ष तीव्र करणार

वेळप्रसंगी ‘आढळे’चा संघर्ष तीव्र करणार

वीरगाव |वार्ताहर| Virgav

आढळा धरणातून संगमनेर तालुक्यातील गावांना देण्यात येणार्‍या पाण्याला विरोध हा पक्षपातळीवरचा प्रश्न नसून हा आमच्या शेतकर्‍यांच्या हक्कासाठीचा लढा असल्याने तो वेळप्रसंगी अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिला.

अकोले तालुक्यातील देवठाणच्या आढळा धरणातून संगमनेर तालुक्यातील चिकणी, सायखिंडी, निमगाव भोजापूर, वेल्हाळे या गावांना पाणी देण्यास आढळा पाणी बचाव कृती समितीतर्फे तीव्र विरोधाची भूमिका लाभधारकांनी घेतली. पाणी देण्याच्या निर्णयाविरोधात वीरगाव, देवठाण, गणोरे, पिंपळगाव, हिवरगाव, डोंगरगाव या गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. डोंगरगाव येथे झालेल्या या विरोध सभेला तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळींसह शेकडो लाभधारक उपस्थित राहिले.

आ. लहामटे म्हणाले, हा प्रश्न मी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यापुढेही मांडणार आहे. प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमोरही ही व्यथा मांडण्यात येईल. आढळेतून पिण्यासाठी पाणी देण्यास आजिबात विरोध नाही. फक्त बिताक्यासारखा प्रकल्प लवकर पूर्ण करावा आणि ओव्हरफ्लोचे पाणी संगमनेर तालुका हद्दीतील नदीपात्रात साठवण करुन पाणी देण्यात यावे. या कामाच्या ठेकेदारानेही जास्त मस्ती करु नये. माथी भडकाविण्याचे काम करु नये. या प्रश्नावर प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही आ. डॉ. लहामटे यांनी दिला.

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि अगस्ती कारखान्याचे व्हा. चेअरमन सीताराम पाटील गायकर म्हणाले, पाण्यासाठी आम्ही कायमच संघर्ष केला. आढळा धरणातून पाण्याचा एकही थेंब आता खाली जाणार नाही. न्याय न मिळाल्यास अधिक तीव्र संघर्षाची रुपरेषा ठरवू आणि आढळेच्या लाभधारकांची भक्कम पाठराखण करु. लाभधारकांना पाठींबा जाहीर करताना कॉ. डॉ. अजित नवले म्हणाले, हा प्रश्न विरोधाचा नाही. असेच पाणी खाली जात राहिले तर आढळेच्या लाभक्षेत्राचे काय? ही पाणी उचलण्याची परवानगी देताना सामुहिक शहाणपणाची गरज होती. 800 दलघफू अतिरिक्त पाणी आढळा धरणात कसे वाढेल याचा विचार करा आणि खुशाल 80 दलघफू पाणी घेऊन जा. मात्र त्याआधी 8 थेंबही पाणी संगमनेरकडे जाऊ देणार नाही.

जि.प.अहमदनगरचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी हा आढळेच्या लाभधारकांसाठी ज्वलंत प्रश्न निर्माण झाल्याचे सांगून आढळा धरणाचे पुनर्वसन वीरगाव, हिवरगाव, डोंगरगाव या लाभक्षेत्रात झाले. ते संगमनेर तालुक्यात झाले नाही. सातत्याने अन्याय या लाभक्षेत्राने सहन केला. आधी पाण्याची उपलब्धता आढळासाठी करा आणि मग खुशाल पाणी घेऊन जा. मात्र तोपर्यंत एक थेंबही खाली जाऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. जिल्हा बँकेचे संचालक मधुकरराव नवले म्हणाले, लाभक्षेत्रातील नागरिकांनाच रोज पिण्यासाठी पाणी मिळत नाही तर ते इतरांना कसे देणार. इथलेच घसे कोरडे असताना संगमनेर तालुक्यातील गावांना पाणी देण्यास तीव्र विरोध करु. कारण या पाण्यावर प्रथम अधिकार हा अकोले तालुक्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी आणि नागरिकांचा आहे.

याप्रसंगी डोंगरगावचे सरपंच बाबासाहेब उगले, विकास शेटे, सुरेश नवले, माजी सभापती सुहास कर्डीले, राजेंद्र घायवट, शांताराम वाकचौरे, महेश नवले, शिवाजी पाटोळे, जालिंदर बोडके, तुळशिराम कातोरे, विठ्ठलराव उगले, नानासाहेब दळवी, सुनिल उगले, शुभम आंबरे, अनिल आंबरे, अमोल उगले, प्रदिप भालेराव, तुषार आंबरे आदींनी आढळेचे पाणी संगमनेरला जाऊ देण्यास तीव्र विरोध करणारी भाषणे केली. या आंदोलनास मिनानाथ पांडे, रामनाथ बापू वाकचौरे, रंगनाथ पाटील वाकचौरे, परबतराव नाईकवाडी, अशोकराव देशमुख, चंद्रमोहन निरगुडे, सुधिर शेळके, माधव तिटमे, प्रदिप हासे, वसंतराव मनकर, कॉ. शांताराम वाळुंज, भानुदास तिकांडे, सिताबाई पथवे, संदीप कडलग, मदन आंबरे आदींसहित भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना, माकप, भाकप आणि इतरही सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते आणि आढळेचे लाभधारक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक सुनिल उगले, सूत्रसंचालन अमोल उगले आणि आभार कॉम्रेड कारभारी उगले यांनी मानले.

अकोले तालुक्यातील सर्व नदीपात्रातील पाण्याचा लाभ खालच्या तालुक्यांना होतो. प्रवराचे एकूण पाण्यापैकी केवळ 13 टक्के पाणी अकोलेसाठी आणि 45 टक्के पाणी संगमनेरसाठी मिळते.उर्वरित पाणी इतर तालुक्यांना जाते. आढळेतूनही अकोलेपेक्षा संगमनेर तालुक्यातील जास्त क्षेत्राचे सिंचन होते. तरीदेखील अधिक पाणी पळविण्याचा प्रयत्न आहे.लोकांच्या पिण्याच्या पाण्याची खोटी काळजी दाखवून केवळ ठेकेदाराचे पोषण व्हावे, हा या योजनेमागचा हेतू आहे.

- जालिंदर वाकचौरे, माजी जि. प. सदस्य, देवठाण गट

या सभेस संगमनेर तालुक्यातील ज्या गावांना पिण्याचे पाणी जाते त्या गावातील नेतेमंडळी हजर होती. आम्हाला आमचे म्हणणे मांडू द्या, अशी त्यांनी मागणी केली असता उपस्थितांनी तीव्र विरोध केला. लाभधारकांचा संताप अनावर झाल्याने अचानक मोठा गोंधळ उडाल्याची स्थिती निर्माण झाली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com