आडगाव पाझर तलावात निळवंडेचे पाणी पोहचले

शेतकर्‍यांकडून जलपूजन करून जल्लोष
आडगाव पाझर तलावात निळवंडेचे पाणी पोहचले

राहाता |प्रतिनिधी| Rahata

निळवंडे धरणाचे पाणी आडगाव येथील पाझर तलावात पोहचले. तरुण शेतकर्‍यांनी या पाण्याचे पूजन करून आनंद व्यक्त केला. तीन पिढ्या या पाण्याची वाट पहात होतो. आज खरोखर हे पाणी आमच्या शेतशिवारात आल्याने आमच्यासाठी हा क्षण ऐतीहासिक असल्याच्या भावना व्यक्त करून निळवंडे धरण व कालव्याच्या कामासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. लवकरच त्यांची वेळ घेऊन आडगाव येथे त्यांचा नागरी सत्कार करणार असल्याचे युवा कार्यकर्ते दिनकर कडलग यांनी सांगितले.

राहाता तालुक्यातील जिरायत पट्ट्यातील आडगाव, केलवड, खडकेवाके, पिंपरी निर्मळ, पिंपरी लोकाई या गावांतील पाझर तलावात सध्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. यंदा पाऊस नसल्याने या परीसरात पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र निळवंडे धरणाचे पाणी आल्याने काही अंशी ही समस्या सुटण्यास मदत होणार आहे. सध्या निळवंडे कालव्याच्या कोपरगाव शाखेला पाणी सोडण्यात आले असून त्यातून लोहारे, पिंपरी लोकाई, केलवड, आडगाव, खडकेवाके, पिंप्री निर्मळ आदी गावांमधील पाझर तलाव भरण्याचे नियोजन ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुचनेनुसार पाटबंधारे विभागाने केले आहे.

त्यानुसार केलवड येथील पाझर तलाव भरल्यानंतर आडगाव येथील पाझर तलावात पाणी सोडण्यात आले. हे पाणी पाझर तलावात पोहचल्यानंतर युवा कार्यकर्ते गणपत शेळके, दिनकर कडलग, गणेश शेळके, राजेश शेळके, वसंत शेळके, रमेश शेळके, शरद शेळके, दिनकर शेळके, मच्छिंद्र शेळके, सागर शेळके, मारूती कडलग, रामदास शेळके, शंकर माळी, अशोक कडलग आदींसह शेतकर्‍यांनी पाण्याचे पूजन केले. दुष्काळात पाणी सोडण्याचे नियोजन केल्याबद्दल ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले.

तीन पिढ्या येथील शेतकरी निळवंडेच्या पाण्याची वाट पहात होते. आज हे पाणी आमच्या शेतशिवारात पोहचले याचा आनंद आहे. निळवंडेचे पाणी दुष्काळी भागाला देण्याचे स्वप्न पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी पाहिले होते. आज ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे स्वप्न प्रत्यक्ष कृतीत उतरविले. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

- गणपत शेळके, युवा कार्यकर्ते आडगाव.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com