
लोणी |वार्ताहर| Loni
शनिवारी दुपारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. दहा मिनिटे झालेल्या गारपिटीने गहू, हरभरा,कांदा आणि फळबागांचे नुकसान झाले.
दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील लोहारे, राहाता तालुक्यातील गोगलगाव, आडगाव, लोणी खुर्द, राजुरी, ममदापूर आदी गावांमध्ये पाऊस आणि गारपीटीला सुरुवात झाली. सुरुवातीला दहा ते पंधरा मिनिटे गारपीट झाली. त्यानंतर पाऊस सुरू झाला. या अवकाळी संकटाने शेतात उभ्या असलेल्या आणि काढणीच्या टप्प्यावर असलेल्या गहू, हरभरा, कांदा, मका आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले. बळीराजा उघड्या डोळ्यांनी हे नुकसान बघण्यापलिकडे काहीच करू शकला नाही. हातातोंडाशी आलेले पीक काही मिनिटात हातातून जात असताना त्याला होणार्या वेदनांचे मोजमाप करता येऊ शकत नाही. नेहमीच अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीचा सामना करणारा बळीराजा हतबल झाला आहे.
शासन आणि विमा कंपनी तुटपुंजी मदत करीत असल्याने बळीराजाचे आर्थिक नुकसान भरून निघत नाही. जे तरूण शेतकरी शेतीमध्ये नव्या उमेदीने उतरले आहेत त्यांच्यात नैराश्य वाढू लागले आहे. पावसाळ्यातील अतिवृष्टीची शासनाकडून मदत मिळाली नसताना पुन्हा नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आल्याने बळीराजा खचून गेला आहे. उभ्या असलेल्या पिकांच्या भरवशावर त्याने पुढचे केलेले नियोजन कोलमडल्याने त्याला या आर्थिक संकटातून बाहेर कसे पडायचे या चिंतेने तो ग्रासून गेला आहे.
शासन नुकसानीचे पंचनामे करील पण मदत कधी मिळणार हाच खरा प्रश्न आहे. विमा कंपनीने जोखीम रक्कमेनुसार भरपाई द्यावी अशी मागणी बळीराजाने केली आहे. आतापर्यत शंभर टक्के नुकसान होऊनही जोखीम रक्कम कधीच मिळालेली नाही. एकीकडे शेतीमालाला भाव नाहीत तर दुसरीकडे अवकाळी पावसाने नुकसान यामुळे शेतीचे अर्थकारणच बदलून गेले आहे.