अहमदनगर (प्रतिनिधी) -

मुरूमाची वाहतूक करताना पकडलेल्या डंपरवर कारवाईसाठी तहसील कार्यालयात घेऊन येत असताना चालकाने तो

पसार केला. नगर शहरातील तपोवन रोडवर काल गुरूवारी सकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांत डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू पठाण असे गुन्हा दाखल झालेल्या डंपर चालकाचे नाव आहे. निंबोडीचे तलाठी विजय बबन बेरड यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. वाळू, मुरूमाच्या बेकायदा वाहतुकीवर कारवाई करण्याकरीता गौण खनिज पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकात निंबोडीचे तलाठी बेरड यांचा समावेश आहे.

हे पथक पेट्रोलिंग करत असताना तपोवन रोडवरील वामनभाऊ चौकात डंपरमधून (एमएच.12, एसएक्स 2523) मुरूमाची वाहतूक करताना मिळून आला. या डंपरवर कारवाई करण्याकरीता तो तहसील कार्यालयात घेण्याचे आदेश बेरड यांनी चालक पठाण याला दिले. मात्र पठाण याने पथकाशी हुज्जत घालून डंपर तेथून पळून नेला. या प्रकरणाची तक्रार तलाठी बेरड यांनी पोलिसांत दिली असून चालक पठाण विरोधात मुरूमाची चोरी आणि पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.