
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
मंदिरात जाताना रागाने गेला तरी चालेल परंतु, तेथून बाहेर पडताना प्रसन्नता व शांततेत यायला हवे, याने जीवन सार्थक होईल. तसेच यामुळे इतरांनाही मंदिरात जाण्याची इच्छा निर्माण होईल, असा उपदेश भारत गौरव प्राप्त आचार्य पुलकसागर महाराज यांनी केला.
येथील आझाद मैदनावर ज्ञानगंगा महोत्सवाचे काल तिसरे पुष्प गुंफताना महाराज बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष व शिर्डी संस्थानच्या विश्वस्त अनुराधा आदिक, नाशिक गजपंथाच्या महामंत्री सुवर्णा काला, मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष रमण मुथा, अंध संस्थेचे अध्यक्ष अॅड. भागचंद चुडीवाल, जितेंद्र छाजेड, डॉ. मनोज छाजेड, अर्चना पानसरे, चंदना महिला मंडळाचे अध्यक्षा सुनीता चुडीवाल, पाठ शाळा प्रमुख प्रिया अग्रवाल उपस्थित होते.
आचार्य पुलकसागर महाराज यांनी एकल व संयुक्त कुटुंब पद्धतीवर भाष्य केले. पती-पत्नीतील नातेसंबंधाबाबत विवेचन करताना ते म्हणाले, आज हम दो हमारे दो अशी एकल कुटुंबपद्धती असताना घरातील भांडणे वाढली आहेत. दुसरीकडे एकत्रित कुटुंब पद्धतीतही भांडणे होती. मात्र याची कुटूंबातील सदस्यांमध्ये विभागणी होत होती. एक सदस्य रागावला, तर दुसरा त्याला सांभाळून घेत होता. आज भांडणे, तणाव वाढला असताना सांभाळायचे कोणी असा प्रश्न निर्माण झाला आहे. पती-पत्नी असून सहनशक्ती नसल्यामुळे आजकालचे विवाह चार महिनेही टिकत नाही. पती पत्नीच्या मनात एकमेकांविषयी प्रेम राहिले नाही. हम साथ साथ है म्हटले जाते, परंतु तुम्ही किती सोबत आहात हे शेजारच्यालाच माहिती आहे.
पूर्वी अतिथी देवो भव म्हणून स्वागत केले जायचे. मात्र आज दरवाजावर कुत्र्यापासून सावधान असे फलक नजरेस पडतात. स्वतःच्या मुलाला सांभाळण्यासाठी नोकर ठेवला जातो, तर कुत्र्याच्या पिल्लाला कडेवर घेतले जाते. मुक्या प्राण्यांवर जरूर प्रेम करा पण आपल्या पाल्याची काळजी घ्या. दुसरीकडे मुलगा जन्माला येण्याच्या आधीच आई-वडिलांमध्ये त्याच्या करियरवरून भांडणे होत आहेत. संतांनी दिलेले प्रवचन लक्षात ठेवले जात नाही, मात्र अनावश्यक गोष्टी ध्यानात ठेवल्या जातात.
लोक भूतकाळात जास्त रमतात. ज्या गोष्टींना महत्त्व नाही अशा गोष्टी सोडून द्यायला शिका. अर्ध्या मिनिटाचा राग घराचे नुकसान करेल त्यापेक्षा तो सोडून दिलेला केव्हाही चांगला. मंदिरातून पूजापाठ करून आल्यानंतर घरात किमान एक तास तरी शांतता ठेवा. पत्नीच्या चुकांवर राग व्यक्त करण्यापेक्षा मानसन्मान द्यायला शिका. चांगल्या गोष्टी केल्यानंतर तिचे कौतुक करायला विसरू नका. शेवटी तुमच्या आयुष्यात तीच काम येणार आहे, असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी समाजाचे अध्यक्ष संजय कासलीवाल यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन औरंगाबाद येथील प्रसिद्ध प्रवीण लोहाडे यांनी तर माजी अध्यक्ष अनिल पांडे यांनी आभार मानले.