आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळच : आचार्य पुलक सागरजी महाराज

आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळच : आचार्य पुलक सागरजी महाराज

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नाव, पद, प्रतिष्ठा, संपत्ती मिळो अथवा न मिळो माणसाला मृत्यू अटळ आहे. जो आला त्याला एक दिवस जायचेच आहे. त्यामुळे ज्याचे जीवन उत्साहाने भरलेले असते त्याच्या मृत्यूचा महोत्सव साजरा केला जातो, असे प्रतिपादन भारत गौरव प्राप्त आचार्य पुलक सागरजी महाराज यांनी केले.

ज्ञानगंगा महोत्सवांतर्गत चौथे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रकाश पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, संजय फंड, संजय छल्लारे, रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, डॉ. वंदना मुरकुटे, हिंद सेवा मंडळाचे सचिव संजय जोशी, संचालक अशोक उपाध्ये, रणजीत श्रीगोड, भाऊसाहेब डोळस, किसान कंनेक्टचे संचालक किशोर निर्मळ, हस्तरेषा तज्ञ कांतीलाल भंडारी, दैनिक सार्वमतचे वृत्तसंपादक अशोक गाडेकर, वैजापूरचे सुभाष बोरा आदी उपस्थित होते.

आचार्य पुलक सागर महाराज यांनी जीवन आणि मृत्यू विषयी आज उपस्थित भाविकांचे डोळे उघडले. ते म्हणाले, जो जीवनाला सुधारेल त्याचा मृत्यू सुधारेल. मात्र, मृत्यूला सुधारायला जाल तर तो सुधारणार नाही. भगवान महावीर म्हणतात संथारा म्हणजे मृत्यूचा उत्सव आहे. संपूर्ण जगात संथाराला विरोध झाला. संथारा ही आत्महत्या नसून मृत्यूचा उत्सव असल्याचे न्यायालयालाही ते मान्य करावे लागले.

80 वर्ष जीवन जगूनही काही उपयोग होत नाही, जीवन जगायचे असेल तर 23 व्या वर्षी शहीद झालेले भगतसिंग असो की, सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर याच्याप्रमाणे जगा. आयुष्य मोठे असून उपयोग नाही ते अर्थपूर्ण असायला हवे. चुकीचे काम करताना खूप चांगले वाटते. मात्र त्याचे परिणाम वाईटच असतात. याउलट चांगले काम करताना ते कष्टमय असतात पण त्याचे परिणाम सुखद असतात. संसारिक माणूस आणि संत यांना मृत्यू येतो. संसारिक माणसाचा मृतदेह खांद्यांवरून नेला जातो. तर संताला मृत्यूनंतर नेण्यासाठी विमान येतात.

जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत त्याला भेटा. मृत्यूनंतर माफ करण्या ऐवजी जिवंत असतानाच माफ करा. त्यामुळे त्याला शांततेने मृत्यू येईल. मृत्युनंतर पस्तावा करण्यात अर्थ नाही. शरीर स्मशानाची यात्रा करेपर्यंत वाट पाहण्यापूर्वी मोक्षाची यात्रा करा. चिता धगधगण्यापूर्वी चेतना जागृत करा तुमचे मनुष्य बनणे सार्थक होऊन जाईल. मेल्यानंतर स्वर्गाची कल्पना करू नका तर जिवंतपणीच स्वर्गासारखे जीवन जगा, तुमचे मनुष्य जीवन सफल होईल, असे त्यांनी शेवटी सांगितले.स्वागत समाजाचे अध्यक्ष संजय कासलीवाल यांनी केले आभार माजी अध्यक्ष अनिल पांडे यांनी मानले तर सूत्रसंचालन औरंगाबाद येथील प्रवीण लोहाडे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com