
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
उत्तर नगर जिल्ह्यात दुचाकी चोरीचा सपाटा लावून धुमाकूळ घालणार्या दोन जणांना राहुरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या आठ दुचाकी जप्त केल्या. त्यांनी ताहाराबाद येथे मंदिरातील तीन दानपेट्या फोडल्याची कबुली दिली. राहुरी न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महेश चांगदेव लोंढे (वय 23) व रोहिदास सुभाष संसारे (वय 19) दोघेही रा. कानडगाव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांना आरोपींची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी कानडगाव येथे दिनांक 20 मे रोजी आरोपींच्या राहत्या घरी पोलीस पथक पाठवून त्यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली असता आरोपींनी दुचाकी चोर्यांची कबुली दिली. राहुरी येथील न्यायालया समोर आरोपींना हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
त्यात आरोपींनी राहाता व कोपरगाव येथे प्रत्येकी तीन व लोणी येथे दोन दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. कानडगाव, वरशिंदे परिसरात निर्जनस्थळी झाडाझुडपात उभ्या केलेल्या आठ दुचाकी आरोपींनी पोलिसांच्या ताब्यात दिल्या. ताहाराबाद येथे 11 मार्च 2023 रोजी मध्यरात्री संतकवी महिपती महाराज मंदिरातील तीन दानपेट्या व सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर असा अठरा हजारांचा मुद्देमाल चोरी प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याची कबुली आरोपींनी पोलीस कोठडीत दिली.
राहाता, कोपरगाव, लोणी हद्दीत ज्यांच्या दुचाकी चोरी झाल्या आहेत. त्यांनी दुचाकीच्या मुळ कागदपत्रांसह राहुरी पोलीस ठाण्यात ओळख पटवावी. न्यायालयामार्फत दुचाकी सोडवून घ्याव्यात. असे आवाहन पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी केले. दुचाकी नं. एमएच 15 सीएल 7597, एमएच 16 एल 5228, एमएच 16 एक्स 4886, एमएच 17 एसी 9486 व विना नंबर चार अशा एकूण आठ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.