विम्याचा लाभ मिळविण्यासाठी अपघातातील वाहन बदलले

नेवासा पोलीस ठाण्याचा तपासी अधिकारी महेश कचे विरुध्द गुन्हा दाखल
विम्याचा लाभ मिळविण्यासाठी अपघातातील वाहन बदलले

नेवासा (शहर प्रतिनिधी)

अपघातातील मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना विम्याचा लाभ मिळविण्यासाठी दुसऱ्या वाहनाचा अपघात केल्याचे भासवून बनावट कागदपत्रे केल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामध्ये नेवासा पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोलीस नाईक महेश कचे याच्याविरुद्ध राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस उपअधीक्षक रविकिरण तुकाराम दरवडे यांच्या फिर्यादी वरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फिर्यादीत म्हटले मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात फौजदारी जनहित याचिका क्रमांक ३/२०२० अन्वये फौजदारी जनहित याचिका दाखल आहे. सदर प्रकरणी उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ विरुध्द महाराष्ट्र शासन प्रकरणात दि. १६ जून २०२१ रोजी उच्च न्यायालयाने कोपरगाव पोलीस ठाणे गुरन ८२७/२०२० भादंवि कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ या गुन्ह्याचे तपासाकामी विशेष पथक तयार करून राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत तपास करणे यावा, असे आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार, तत्सम अपघात दाव्यांचे तपासाकरिता विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या गुन्हयाचा तपास विशेष तपास पथकातील पोलीस उपाधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, अहमदनगर हे करीत आहेत.

विशेष तपास पथकामार्फत इन्शुरन्स कंपनीव्दारे सादर करण्यात आलेल्या १० संशयित अपघात दावे प्रकरणांपैकी मोटार अपघात दावा प्राधिकरण, श्रीरामपूर जि. अहमदनगर येथील अपघात दावा क्र. २३/२०२० या दाव्याच्या पडताळणीचे काम पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे आदेशाने सुरू आहे.

या गुन्ह्याच्या संदर्भाने दाखल करण्यात आलेला सदर चौकशी मध्ये मयताचा मित्र संदीप नानासाहेब तळपे याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर बबलु बर्डे याने अपघातात मयत झालेल्या मुरलीधर संभाजी क्षीरसागर याचा दि. २३ डिसेंबर २०१९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास नेवासा ते शेवगाव रोडवर भानसहिवरा शिवारात झालेल्या ट्रॅक्टर व मोटार सायकलमधील अपघाताने मृत्यू झाल्याचे फोटो अपघाताच्या दिवशी संदीपभाऊ तळपे मित्रमंडळ या व्हॉटसअॅप ग्रुपवर टाकले होते.

सदर अपघात घडल्या ठिकाणाचे फोटो मयताचे नातेवाईकांच्या मोबाईलवरून गो डिजीट जनरल इन्श्युरन्स कंपनीचे प्रतिनिधी यांचे मोबाईल नंबरवर पाठविले आहेत. सदर दोन्ही मोबाईल नंबरवर पाठविलेले अपघाताचे फोटोग्राफ सारखेच असून सदर अपघात ठिकाणी काढलेल्या फोटोग्राफमध्ये अपघातात सामील असलेला स्वराज ट्रॅक्टर नं. एमएच ४१ एएल ७१७१ मराठी नाना असे फॅन्सी नंबर असलेला सदर ट्रॅक्टरच्या दोन चाकांच्या मध्ये मयत मुरलीधर संभाजी क्षीरसागर याची मोटसायकल पडलेली सदर फोटोग्राफमध्ये दिसत आहे, असे असताना नेवासा गुन्हा रजि. ७७१/२०१९ मधील फिर्यादी बाबासाहेब संभाजी क्षीरसागर याने इतर आरोपींशी संगनमत करून सदर फिर्यादीमध्ये महिन्द्रा कंपनीचा ट्रॅक्टर नं. एमएच ४२ एफ ३९०४ ने अपघात केल्यामुळे मुरलीधर संभाजी क्षीरसागर हा मयत झाल्याचे जाणीवपूर्वक खोटे सांगितले. ज्या ट्रॅक्टरने अपघात केला तो गुन्ह्यातून काढून टाकून पुरावा नष्ट करणे कामी इतर आरोपींना पोलीस नाईक महेश कचे याने मदत केली आहे.

सदर अपघातामध्ये सामिल असलेला स्वराज ट्रॅक्टर हा आरोपी बाळकृष्ण आव्हाड याचा भाऊ भरत वाल्मिक आव्हाड याचे नावे नोंद असल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. नेवासा पोलीस स्टेशन मधील तपासी अधिकारी पोना महेश हरिश्चंद्र कचे याने इतर आरोपींबरोबर संगनमत करून सदर अपघातात सामील असलेला ट्रॅक्टर बदलून खोटी व बनावट कागदपत्रे तयार केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत आहे. तसेच सदरील गुन्ह्यातील घटनास्थळाचा पंचनामा हा घटनास्थळावर केलेला नसल्याबाबत कागदपत्रांवरून स्पष्ट झालेले असतानाही सदरील घटनास्थळाचा पंचनामा हा घटनास्थळावर केल्याबाबतची खोटी कागदपत्रे तयार केली आहेत.

या प्रकरणी बाबासाहेब संभाजी क्षीरसागर, बाळकृष्ण वाल्मिक आव्हाड, भारत वाल्मिक आव्हाड व तपासी अधिकारी पोना महेश हरिश्चंद्र कचे यांच्याविरुध्द भादंवि कलम १६६,१६६ ( अ ), १६७, १९६,२०१ २०२, २०३,४०६, ४९८, ४६७ ४६८, ४७१,१२० (ब) व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com