अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात नेण्याची गरज नाही

एसपी पाटील : वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचे केले आवाहन
अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात नेण्याची गरज नाही

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अपघात झाल्यानंतर अपघात स्थळावरून वाहन पोलीस ठाण्यात विनाकारण आणू ठेवण्याची गरज नाही. अपघातानंतर ज्या वाहनांची उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना तपासणी करणे आवश्यक आहे. सुरक्षितेच्या कारणास्तव वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात आणणे आवश्यक आहे. तेवढेच अपघातग्रस्त वाहन पोलीस ठाण्यात आणले पाहिजे. पोलिसांनी विनाकारक वाहन ठाण्यात आणून ठेवले किंवा ठेवत असल्यास वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत अधीक्षक पाटील बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अनिल कटके उपस्थित होते. अधीक्षक पाटील म्हणाले, किरकोळ अपघातातील वाहने पंचनामा झाल्यानंतर तात्काळ मालकांना दिली जाणार आहेत. जे अपघातग्रस्त वाहनाचे मालक वाहन घेऊन जाणार नाहीत, त्यांना प्रती तास 50 रुपये दंड आकारण्याची तरतूद कायद्यात आहे. वाहन मालकांनी वाहने ताब्यात घ्यावीत, असे आवाहनही अधीक्षक पाटील यांनी केले आहे.

कोणत्याही किरकोळ अपघातामध्ये पंचनामा झाल्यानंतर वाहन हे तात्काळ मालकास दिले पाहिजेत. किरकोळ अपघातामधील वाहने पोलीस ठाण्यात आणू नयेत. ज्या अपघातामध्ये कोणी ठार झाले असेल, अशाच मोठ्या अपघातामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना वाहनांची तपासणी करावयाची असेल तरच आवश्यकतेनुसार पोलीस ठाण्यात आणावे. अशा वाहनांची तपासणी झाल्यानंतर मालकांना वाहने सुपूर्द करावीत. अपघातग्रस्त वाहनांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळते. त्यामुळे मालक अशी वाहने घेऊन जाण्याचे टाळतात. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत अशा स्वरूपाची हजारो वाहने पडून आहेत.

या वाहनांच्या मालकाचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या आवारातील बेवारस पडून असलेल्या वाहनांच्या मालकांचा शोध घेतला जाणार आहे. या वाहनांमुळे पोलीस ठाण्यांना बकाल स्वरूप आले आहे. काही वेळेस अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्याकडेला पडून राहतात. अपघातग्रस्त वाहनांचा पंचनामा झाल्यानंतर मालकांनी ही वाहने घेऊन जावीत. अशा वाहनांना प्रती तास 50 रुपये प्रमाणे दंड आकारला जाईल, असेही अधीक्षक पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.