अपघातग्रस्त ट्रकमध्ये आढळला पाच लाखाचा गुटखा

पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी शिवारात घटना
अपघातग्रस्त ट्रकमध्ये आढळला पाच लाखाचा गुटखा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील ढवळेवाडी शिवारात अपघातग्रस्त मालवाहू ट्रकमध्ये सुमारे पाच लाख दहा हजार रुपये किमतीचा हिरा कंपनीचा गुटखा आढळून आला असून पोलिसांनी ट्रकसह 8 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त जप्त केला आहे.

याप्रकरणी दत्तु नामदेव खेडकर (रा. चुंभळी, ता. पाथर्डी जि.अहमदनगर) या संशयिता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार राजेंद्र रामदास बडे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार, ढवळेवाडी शिवारात एका मालवाहू ट्रकला अपघात झाला असून यामध्ये सुगंधी सुपारी व तंबाखू असल्याची माहिती पाथर्डी पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी गेले असता अशोक लेलँड कंपनीचा (एमएच 17 एजी 9224 ) ट्रक रस्त्याच्या कडेला चरांमध्ये गेला होता.

तपासणी केली असता पोलिसांना ट्रक मध्ये सुगंधी तंबाखूच्या गोण्या आढळून आल्या. यामध्ये चार लाख वीस हजार रुपये किमतीच्या हिरा कंपनीच्या दहा गोण्या सुगंधी सुपारी, 90 हजार रुपये किमतीची हिरा कंपनीची सुगंधी तंबाखू, व तीन लाख रुपये किमतीचा मालवाहू ट्रक असा आठ लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी गुटखाबंदी कायद्यानुसार भादवी 328,188, 272, 273 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मालवाहू ट्रक मधील गुटखा कुठून आला व कुठे जाणार होता याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास गुटखा माफीयांचे पाळेमुळे उघडकीस येणार आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com