मालट्रक व स्वीफ्ट कारची धडक, तरुण जागीच ठार

File Photo
File Photo

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

मालट्रक व स्वीफ्ट कार यांच्यात झालेल्या धडकेत कारमधील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना संगमनेर खुर्द शिवारात काल पहाटे 1.55 वाजेच्या सुमारास घडली. कृष्णा सुभाष कर्पे (वय 28, रा. मेनरोड, संगमनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. कृष्णा कर्पे याचा माऊली डेकोरटर नावाने व्यवसाय आहे. तो काल सोमवारी सायंकाळी संगमनेर खुर्द शिवारातील कुबेर लॉन्स येथे गेला होता.

काल पहाटे दीड वाजेच्या सुमारास तो तेथून काम संपल्यानंतर आपल्या ताब्यातील स्वीफ्ट कार क्रमांक एम. एच. 03, ए. एम. 9981 मधून संगमनेरच्या दिशेने येत होता. दरम्यान संगमनेर खुर्द शिवारात शिवनेरी पतसंस्थेच्या वळणावर त्याचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने समोरून येणार्‍या मालट्रकवर कार जोरदार आदळली. कारमधील कृष्णा कर्पे हा गंभीररित्या जखमी झाला होता. अपघाताचा आवाज होताच स्थानिकांनी घटनेच्या दिशेने धाव घेतली. त्याला बाहेर काढत खासगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या खबरीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 103/2021 नुसार नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन करत आहेत.

मयत कृष्णा कर्पे याच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे यांचा तो पुतण्या होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com