
देवगडफाटा |वार्ताहर| Devgad Phata
अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावरील जुने कायगाव (ता. गंगापूर) येथील निसर्ग हॉटेल जवळ दुचाकीस्वारांना अज्ञात वाहनाने दिलेल्या जोराच्या धडकेत एकजण ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेला तरुण प्रवरासंगम येथील आहे.
याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील रहिवासी राहुल बाळासाहेब कोरडे (वय 28) हे आपल्या दुचाकीवरून गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव येथील एका कंपनीत कामाला जात होते. नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळी सात वाजता त्यांच्या कामाची शिफ्ट सुटल्यावर ते प्रवरासंगमकडे घरी परतत असताना अहमदनगर - छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावर निसर्ग हॉटेल जवळ त्यांच्या दुचाकीस (नंबर उपलब्ध नाही) पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.
या भीषण अपघातात राहुल कोरडे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनास्थळी रक्तस्राव जास्त झाला होता. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरा प्रवरासंगम येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृत राहुलच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. शेती करून उदरनिर्वाह चालवणार्या वडिलांना तीन वर्षांपासून अर्धांगवायू झालेला आहे. ते घरी अंथरुणावर पडून आहेत. राहुल कुटुंबातील कर्ता व एकुलता एक हुशार मुलगा होता. त्याच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.