अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवक ठार

गंगामाई कारखान्याची आग पाहण्याची गडबड आली अंगलट
अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवक ठार

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

गंगामाई कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला लागलेली आग पाहण्यासाठी गडबडीत निघालेल्या दोन तरुणांचा तालुक्यातील गुंफा गावच्या नजीक असलेल्या दत्त पाटी परिसरात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दि.25 रोजी घडली.

मनोज शामराव खरड (26, रा.देवटाकळी), विशाल मच्छिंद्र फाटके (21 रा.बक्तरपूर, ता. शेवगाव) अशी मयत झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नजीक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी लागलेली आग पाहण्यासाठी विशाल फाटके व मनोज खरड हे दोघे आपल्या मोटारसायकलवरून (क्रमांक एम. एच. 16 डीडी 4596) गंगामाई कारखान्याकडे जात असताना रात्री 10 च्या सुमारास शेवगाव नेवासा रस्त्यावरील गुंफे गावाजवळ असलेल्या दत्त पाटी परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

त्यात मनोज खरड यांचा जागीच मृत्यू झाला तर विशाल फाटके हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला. अपघाताच्या या घटनेमुळे देवटाकळी बक्तरपूर गावांवर शोककळा पसरली. शेवगाव पोलिसांनी अपघाताच्या घटनेची नोंद केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com