
कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)
भरधाव कंटेनरने दुचाकीस्वरास चिरडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मुंबई नागपूर महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे शिवारात घडली. या दुर्घटनेत एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर एक जण गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर वैजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मुनीर नजीर इनामदार (वय 53 रा. भउर, तालुका वैजापूर) असे मयताचे नाव असून अशोक तबाजी दिवे हे गंभीर जखमी झाले आहे. घटना घडल्यानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुनीर इनामदार आणि अशोक दिवे हे दुचाकीवरून मुंबई नागपूर महामार्गावरून निघाले असता भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने चाकाखाली येऊन चिरडले गेले. यामध्ये मुनीर नजीर इनामदार यांचा जागीच मृत्यू झालाय तर अशोक दिवे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व मृतदेह रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवले असून याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मुक्तार उस्मान सय्यद (वय 49 वर्ष) राहणार धोत्रे, कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 482 /22 भारतीय दंड विधान कलम 304 ,279,337,338, 427 मोटार वाहन कायदा कलम प्रमाणे कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असुन घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करीत आहे.