अज्ञात वाहनाच्या धडकेत ग्रामसेवक ठार

करंजीत ग्रामस्थांकडून कडकडीत बंद
अज्ञात वाहनाच्या धडकेत ग्रामसेवक ठार

करंजी |प्रतिनिधी| Karanji

पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात सोमवारी (दि.31) रात्री भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेले आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त अनिल शिवाजी भाकरे (37) यांचा बुधवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी करंजीत सर्व ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामसेवक भाकरे सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास करंजी बस स्टॅन्डकडून घराकडे येत असताना त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने अपघात झाला. त्यानंतर तात्काळ त्यांना नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी प्रकृती आणखी खालावल्याने भाकरे यांना मंगळवारी पुणे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, नगर तालुक्याचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, ग्रामसेवक संघटनेचे राज्य अध्यक्ष एकनाथराव ढाकणे, नगर तालुका विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, तुपे, अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन विजयकुमार बनाते तसेच नगर जिल्ह्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामस्थ, तरुण वर्ग उपस्थित होते. भाकरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com